'एमआयएम'ने तयार केला 'भारिप'शी आघाडीचा प्रस्ताव : पक्षाचे वरिष्ठ घेणार प्रकाश आंबेडकरांची भेट 

लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाने भारिप-बहुजन महासंघासोबत आघाडीचा प्रस्ताव तयार केला आहे. 'एमआयएम'चे नेते याच महिन्यात या संदर्भात प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत.
'एमआयएम'ने तयार केला 'भारिप'शी आघाडीचा प्रस्ताव : पक्षाचे वरिष्ठ घेणार प्रकाश आंबेडकरांची भेट 

औरंगाबाद : लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाने भारिप-बहुजन महासंघासोबत आघाडीचा प्रस्ताव तयार केला आहे. 'एमआयएम'चे नेते याच महिन्यात या संदर्भात प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत. 

भारिपसोबतच इतर दलित समाजातील पक्षांनासुद्धा सोबत घेऊन वेगळी आघाडी करण्याचा 'एमआयएम'चा प्रयत्न आहे. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दलित पक्षांना सोबत घेऊन 'एमआयएम'ने 'जय मीम-जय भीम'च्या समीकरणाची तयारी सुरू केली आहे. 
वर्ष 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने लक्षणीय मते घेतली होती. त्यांचे भायखळामधून वारिस पठाण; तर औरंगाबाद मध्यमधून इम्तियाज जलील विजय झाले. पक्षाने औरंगाबाद पूर्व, सोलापूर, नांदेड, परभणी येथील मतदारसंघांतही ठळक मते घेतली होती. 2014 मध्ये 'एमआयएम'ला काही प्रमाणात दलित समाजाचीसुद्धा मते मिळाली होती. त्यामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारिपला सोबत घेण्यासाठी एमआयएम अनुकूल असून, असदुद्दीन ओवेसी यांनी अशी आघाडी करण्यास राज्यातील नेत्यांना अगोदरच मंजुरी दिली आहे. 

'एमआयएम'ने हा प्रस्ताव भारिपच्या नेत्यांना पाठविला आहे; मात्र त्यावर अधिकृतपणे अजूनही चर्चा झालेली नाही. दलित-मुस्लिम समाज जर एकत्र आला तर त्यांच्या मतांचे विभाजन होणार नाही. अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार हे जोरदार लढतीत राहतील, असे गणित एमआयएमने तयार केले आहे. एमआयएमने आघाडी करताना जास्तीत जास्त जागांवर दावा करण्याचा आग्रहसुद्धा सोडला आहे. 

दलित-मुस्लिमबहुल मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून मुस्लिमबहुल मतदारसंघात 'एमआयएम'चा, तर दलितबहुल मतदारसंघात भारिपचा किंवा इतर दलित पक्षांचा उमेदवार द्यायचा, असा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये अकोला व औरंगाबाद, नांदेड, मालेगाव या लोकसभा मतदारसंघांवर 'एमआयएम'ने लक्ष केंद्रित केलेले आहे. 

यामध्ये कोणतीही जागा भारिपला देण्याची 'एमआयएम'ने तयारी केली आहे; तसेच विधानसभेसाठीसुद्धा सर्वच जागांवर लक्ष केंद्रित न करता दलित-मुस्लिमबहुल जागांवर लक्ष केंद्रित करून येथील मतांचे विभाजन टाळण्यासाठी मुस्लिम-दलित मतांची मोट बांघण्याचा 'एमआयएम'कडून प्रयत्न केला जात आहे. 

दलित-मुस्लिम एकत्र आले तर राज्यात नवीन समीकरण तयार होऊन लोकसभा आणि विधानसभेत त्यांचे जास्तीत जास्त प्रतिनिधी जातील. आता आम्ही आघाडीसाठी भारिपला थेट प्रस्ताव पाठविला आहे. याच महिन्यात आम्ही प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन आघाडीसाठी चर्चा करू. प्रकाश आंबेडकर आणि 'एमआयएम'ने आघाडी करून मैदानात उतरावे, असे आम्हाला वाटते. 
- इम्तियाज जलील, आमदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com