एक टक्का कोरोनाबाधितांचा घाबरल्यामुळे मृत्यू; अभिमन्यू पवार यांचा दावा

कोरोना रूग्णांनी थोडेही न घाबरता उपचार घेतले पाहिजेत, यासाठी प्रयत्न केले. सध्या मृत्यूचे प्रमाण केवळ रूग्णांच्या घाबरण्यामुळे वाढले आहे. कोरोनावर पहिला उपाय म्हणून घाबरू नका. नाकातोंडातून पाणी पडेपर्यंत वाफ घ्या. हळद व मीठाच्या गुळण्या करा. आहार घेऊन व फळे खाऊन चांगला आराम करा, असा सल्ला आमदार अभिमन्यू पवार यांनी दिला आहे
BJP MLA Abhimanyu Pawar
BJP MLA Abhimanyu Pawar

लातूर  : कोरोनाचा सध्याचा जो मृत्यू दर आहे, या मृत्यूदराच्या एक टक्का लोकांचा केवळ भीतीमुळे मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी पहिला उपाय म्हणजे न घाबरणे होय. न भीता संयमाने उपचार घेतल्यास कोरोनावर मात करणे शहज शक्य आहे, असा दावा कोरोनावर मात केलेले आणि प्लाझ्मा दान केलेले भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केला आहे.

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार पवार म्हणाले, "कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेत मतदारसंघात फिरलो. सात जुलै रोजी कोरोनाची लक्षणे जाणवताच थोडेही विचलित न होता काळजी घेण्यास सुरवात केली. मुंबईत उपचार घेण्याचा आग्रह होत असताना लोकांचा स्थानिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढवण्यासाठी विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत दाखल झालो. संस्थेतील सर्व डॉक्टर व कर्मचारी खूप छान आहेत. घाबरल्यामुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव मला होती. यामुळे थोडेही न घाबरता उपचार घेतले,'' 

ते पुढे म्हणाले, ''मला फक्त स्पेशल रूम होती. उपचार व आहार अन्य रूग्णांसारखाच होता. दहा दिवस उपचाराच्या काळात सर्व रूग्णांसोबत संवाद साधत त्यांना धीर दिला. आम्ही सर्वच पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांच्याशी बोलताना काहीच वाटले नाही. डॉक्टर व कर्मचारी पीपीई कीट घालून येत होते. यामुळे कोरोना रूग्णांनी थोडेही न घाबरता उपचार घेतले पाहिजेत, यासाठी प्रयत्न केले. सध्या मृत्यूचे प्रमाण केवळ रूग्णांच्या घाबरण्यामुळे वाढले आहे. कोरोनावर पहिला उपाय म्हणून घाबरू नका. नाकातोंडातून पाणी पडेपर्यंत वाफ घ्या. हळद व मीठाच्या गुळण्या करा. आहार घेऊन व फळे खाऊन चांगला आराम करा,''

''कोरोनावरील उपचारालाही घाबरून जाण्याची गरज नाही. केवळ औषधी गोळ्या घ्यायच्या असतात. काहीही होत नाही. कोरोनामुळे काहीच होत नाही. मलाही काहीच झाले नाही. फक्त डोक्यावरचे केस कमी झाले,'' असेही आमदार पवार यांनी सांगितले. लक्षणे दिसल्यास कोरोनाचा आजार लपवू नका. तसे केल्यास चांगलेच अंगलट येईल. लक्षणे दिसल्यास स्वॅब द्या व अहवाल येईपर्यंत घरातच बसा, कोणाच्या संपर्कात जाऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

प्लाझ्माचे सर्वश्रेष्ठ दान

प्लाझ्मा दानाबाबत गैरसमज आहेत. मी व माझ्या मुलाने दोन दिवसापूर्वीच प्लाझ्मा दान केला. थोडा अशक्तपणा येतो. मात्र, असा अशक्तपणा तर रक्तदान केल्यानंतरही येतो. यामुळे गैरसमज करून घेऊन नयेत. प्लाझ्मा दानामुळे कमीत कमी दोन व जास्तीत जास्त चार जणांचा जीव वाचतो. चौघांना जीवनदान मिळत असेल तर त्यापुढे या अशक्तपणाची बाब दुर्लक्ष करण्याजोगी आहे. शेवटी स्वतःसाठी जगायचे का? आपण बरे झालो म्हणून इतरांनाही बरे करण्याचा विचार झाला पाहिजे. प्लाझ्मा दान दिल्यानंतर दोन दिवस आराम करायचा असतो. मी तर आरामही केला नाही. यामुळे गैरसमज करून न घेता सर्वांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे यावे, असे आवाहन आमदार पवार यांनी केले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com