गंगापूरमध्ये प्रशांत बंब यांची हॅट्रीक; राष्ट्रवादीच्या मानेंचा पराभव

गंगापूरमध्ये प्रशांत बंब यांची हॅट्रीक; राष्ट्रवादीच्या मानेंचा पराभव

गंगापूर: गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक न होण्याची परंपरा युतीचे प्रशांत बंब यांनी मोडीत काढली. राष्ट्रवादीचे संतोष माने यांचा तब्बल 34900 मतांनी पराभव करत बंब यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

प्रभावी प्रचार आणि सुयोग्य नियोजनातूनच घड्याळाचा अचूक वेध घेत बंब यांनी तिसऱ्यांदा विधानसभा गाठली आहे. यावेळची निवडणूक सर्वार्थाने लक्षवेधी राहिली. मतदारसंघात सर्वांत प्रथम प्रशांत बंब यांची उमेदवारी जाहीर झाली असली, तरी तत्पूर्वीच त्यांनी तयारी सुरू केलेली होती. आपले नेतृत्व व कर्तृत्वगुण सिद्ध करताना आमदार बंब यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आवाज उठवला. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांची दखल घेत त्यांना पक्षात मानाचे पान दिले.

मतदार संघात एकापाठोपाठ निवडणुकांत सत्ता काबीज करीत बंब यांनी प्रस्थापितांना हादरा दिला होता. या निवडणुकीत जातीच्या गणितावर हेवीवेट नेते प्रशांत बंब यांना शह देण्याचा प्रयत्न झाल्याने या मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. परंतु येथील निकाल अपेक्षित असाच लागला. निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले संतोष माने यांच्यावर मतदारांनी विश्‍वास दाखवला नाही. मतदारांनी मात्र जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता विकासाला साथ देत बंब यांच्यावर पुन्हा एकदा विश्‍वास दाखवला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगावकर, प्रशांत बनसोड, दिनेश मूथा, संपत छाजेड यांनी समर्थपणे प्रचाराची धुरा सांभाळली. सुरवातीपासूनच आमदार बंब आघाडीवर होते. संपूर्ण मराठवाड्याला मोठी उत्सुकता लागून असलेल्या येथील निकालाने विरोधकांच्या अपेक्षा व दावे-प्रतिदावे मोडीत काढले. या निवडणुकीत विरोधकांनी विकास मुद्द्यावर निवडणूक न लढविता आरोप करण्यावर भर दिला. या पूर्वी मतदार संघात कधीही कोणीही तिसऱ्यांदा विजयी झाले नव्हते. त्यामुळे या परंपरेचे काय होणार, हा प्रश्‍न होता. पण, मतदारांची भक्‍कम साथ आणि युतीच्या नेत्याचे बळ या जोरावर प्रशांत बंब यांनी बाजी मारलीच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com