अब्दूल  सत्तार  औरंगाबादेत एमआयएमचे आव्हान मोडून काढणार का?

sattar
sattar

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्षअब्दूल  सत्तार  हे भविष्यात एमआयएमचे आव्हान मोडून काढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नांदेड महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या  पराभवात   सत्तार यांचा सिंहाचा वाटा होता . त्यामुळे औरंगाबाद शहरात नांदेडची पुनरावृत्ती होईल का या भीतीने  एमआयएमचे धाबे दणाणले आहे . 

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचे अब्दुल सत्तार  हे  विश्‍वासू  अनुयायी आहेत .ते  सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत . आघाडी सरकारमध्ये ते मंत्रीही होते .  सिल्लोड नगरपालिका निवडणूकीत देखील सत्तार यांनी एमआयएमची डाळ शिजू दिली नव्हती. 2014 मधील विधानसभा निवडणूकीत सिल्लोड वगळता इतर मतदारसंघात कॉंग्रेसचा सफाया झाला होता. मात्र सिल्लोड मतदारसंघात अब्दूल  सत्तार यांनी  एमआयएमची डाळ शिजू दिलेली नव्हती . 2015 मध्ये झालेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीतही एमआयएमचा जोर दिसून आला. आजघडीला औरंगाबाद  महापालिकेत या पक्षाचे 25 नगरसेवक आहेत.  

नांदेड महापालिकेत मुस्लिम बहूल वॉर्डांची संपूर्ण जबाबदारी अशोक चव्हाण यांनी अब्दूल  सत्तार  यांच्यावर सोपवली होती .    अब्दूल  सत्तार यांनी  कौशल्य आणि  चलाखी पणाला लावून    मुस्लिम मते पुन्हा कॉंग्रेसकडे वळवण्याची कामगिरी करून दाखवली . एवढेच नव्हे तर  एमआयएमच्या मनगटशाहीच्या डावपेचातही भारी ठरत सत्तार यांनी आपणच बाहुबली असल्याचे दाखवून दिले . मतदाना   दिवशीच्या डावपेचात आणि बूथ मॅनेजमेंट मध्येही सत्तार यांनी आपली चमक दाखवून दिलेली आहे . काँग्रेस पक्षात आता अब्दूल  सत्तार   एमआयएम स्पेशालिस्ट मानले  जाऊ लागले आहेत .

त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आपला हुकुमाचा एक्का म्हणून सत्तार यांना राज्यभर  एमआयएमच्या विरोधात वापरणार अशी चिन्हे आहेत .  औरंगाबाद शहरातील एमआयएमचा प्रभाव कमी करून नांदेड प्रमाणेच मुस्लिम मते पुन्हा कॉंग्रेसकडे वळवण्याची आणि जिल्हा कॉंग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर करण्याची जबाबदारी सत्तार यांच्यावर  आहे. भविष्यात अब्दुल सत्तार हे एमआयएमच्या विरोधात आक्रम भूमिका घेण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

 हैदराबाद मार्गे ज्या नांदेड वाघाळा महापालिकेतून एमआयएमचा महाराष्ट्रात शिरकाव झाला, त्या नांदेडमध्येच पदरी अपयश आल्याने एमआयएम बिथरली आहे. नुकत्याच झालेल्या नांदेड महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसने मुस्लिम बहुल भागात जोरदार कमबॅक केल्याने एमआयएमचे चांगलेच धाबे दणाणले आहे. नांदेडच्या अपयशाने   आपला  प्रभाव  कायम राहावा यासाठी  एमआयएम भविष्यात अधिक आक्रमक आणि कट्टरतेची भूमिका घेणार अशी चिन्हे महानगरपालिकेच्या  त्यांच्या  धुडगुसावरून  स्पष्ट होते 

2012 मध्ये झालेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेत एमआयएमने पहिल्याच फटक्‍यात अकरा नगरसेवक निवडूण आणत कॉंग्रेसची वोट बॅंक हिसकावली होती. त्यांनतर ऑक्‍टोबर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत एमआयएमने औरंगाबादमधील पुर्व, पश्‍चिम आणि मध्य या तीनही मतदारसंघात उमेदवार दिले होते. 

मध्य मतदारसंघातून एमआयएमचे इम्तियाज जलील हे वीस हजार मतांनी विजयी झाले होते. शिवसेना-भाजप स्वतंत्र लढल्याचा फायदा या मतदारसंघात एमआयएमला झाला होता. शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल आणि भाजपचे किशनचंद तनवाणी यांचा पराभव करत मिळालेला विजय एमआयएमची ताकद वाढवणारा ठरला होता. इम्तियाज जलील मध्यमधून विजयी झाले होते .  

पुर्व मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार डॉ. गफ्फार कादरी यांनी देखील कॉंग्रेसचे राजेंद्र दर्डा, भाजपचे अतुल सावे, शिवसेनेच्या कला ओझा यांना जोरदार टक्कर देत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. अवघ्या सहा हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. पश्‍चिम मतदारसंघात एमआएम पुरस्कृत उमेदवार गंगाधर गाडे यांनी देखील शिवसेनेचे संजय सिरसाट यांना कडवी झुंज देत 65 हजार मते मिळवली होती. 

पहिल्यांदाच  विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या एमआयएमला औरंगाबाद शहरातील मुस्लिम बहुल भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे एका मतदारसंघात विजय तर दोन ठिकाणी एमआयएमचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.  परंतु नुकत्याच झालेल्या नांदेड महापालिकेत अकरावरून शून्यावर आलेल्या एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. 

जलील यांना आव्हान ?

2014 मध्ये शिवसेना-भाजप स्वतंत्र लढल्यामुळे हिंदू मतांचे झालेले विभाजन एमआयएमच्या पथ्यावर पडले होते. तीन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. एमआयएम मधील गटबाजी, हेवेदावे आणि अंतर्गत कलह चव्हाट्यावर येऊ लागले. आरोप-प्रत्यारोपांमुळे एमआयएमवर मुस्लिम समाजातील सुशिक्षित गट नाराज झाला.

 परिणामी बुढीलेन भागात झालेल्या महापालिकेच्या पोटनिवडणूकीत एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव झाला. शहरातील एमआयएमची ताकद कमी होत असतांनाच नांदेडच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे मध्य मतदारसंघातील इम्तियाज जलील यांची आमदारकी टिकवण्या सोबत शहरातील अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान एमआयएमला भविष्यात पेलावे लागणार आहे. नांदेड महापालिका निवडणूकीत झालेल्या दारूण पराभवाचे शल्य एमआयएममध्ये दिसून येत आहे.

 महापालिकेतील सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत केलेली तोडफोड आणि महापौरांच्या दिशेने खुर्ची फेकण्याचा प्रकार हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. या शिवाय पक्षात आलेल्या नव्या कार्यकर्त्यांची वाढती महत्वाकांक्षा ही देखील पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहे. दुसरीकडे महापालिका व शहरातील विविध आंदोलना दरम्यान आक्रमक होणाऱ्या एमआयएम मुळे धार्मिक सलोख्यावर विपरित परिणाम होऊ नये याची चिंता शहरवासियांना वाटू लागली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com