माढ्यामागचा भाजपचा आडाखा!

माढ्यामागचा भाजपचा आडाखा!

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करून माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या गेल्या दशकभरातील वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न भाजपने आज केला आहे. नाईक निंबाळकर यांची उमेदवारी माढा मतदारसंघाची दोन जिल्ह्यात विभागलेली रचना विचारात घेऊनच दिली गेली असल्याचे स्पष्ट दिसते आहे. 

रणजितसिंह नाईक निंबाळकर फलटणच्या नाईक निंबाळकर कुटुंबातील सदस्य. त्यांचे वडील माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर इंदिरा गटाचे. 1977 ला देशभर इंदिराविरोध असताना हिंदूराव नाईक निंबाळकर इंदिरा गांधींसोबत राहिले. सातारा जिल्ह्यात नाईक निंबाळकरांसोबतच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे घराणेही इंदिरानिष्ठ. या धाग्यातून नाईक निंबाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात सख्य. त्यातूनच रणजितसिंह यांना अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच चव्हाण यांनी सातारा काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. मात्र, रणजितसिंह हे माढा मतदारसंघातील असल्याने सातारा जिल्हा काँग्रेसने त्यांना दोन महिन्यांत स्विकारले नाही. काँग्रेसची विस्कटलेली घडी सावरू, असे रणजितसिंह यांनी काँग्रेसची सूत्रे स्विकारताना सांगितलेले. मात्र, घडी सावरण्याची शक्यता नसल्याचे पाहून त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा रस्ता पकडला. 

फलटण आणि माण हे सातारा जिल्ह्यातले दोन तालुके माढा मतदारसंघात येतात. या दोन्ही तालुक्यांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. माढा, माळशिरस, सांगोला आणि करमाळा हे चार तालुके सोलापूर जिल्ह्यात येतात. त्यापैकी माळशिरसमध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व आहे. विजयसिंह यांचे पूत्र रणजितसिंह मोहिते पाटील आधीच भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. 

माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या बाजूने झुकलेली निवडणूक फिरविण्यासाठी सातारा जिल्ह्याशी संबंधित आणि सोलापूर जिल्ह्यातीलच उमेदवार ही भाजपची गरज होती. रणजितसिंह मोहिते पाटील गटाला विधानसभेसाठी आणि कारखान्यांना संकटातून बाहेर काढण्याचे आश्वासन देऊन लोकसभेसाठी थांबवता येणे भाजपला शक्य होते. ते केले गेले. त्या बदल्यात त्यांची ताकद माळशिरस, करमाळा आणि माढ्यामध्ये वापरता येणार आहे.

नाईक निंबाळकर कुटुंबाचे लागेबंधे विचारात घेता राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना आधी सोपे वाटणारे फलटण आणि माण विधानसभा मतदारसंघ आता जड जाणार आहेत. शिवाय, पृथ्वीराज चव्हाण यांची राष्ट्रवादीशी असलेली 'मैत्री' परिचित आहे. चव्हाण-रणजितसिंह यांचे सख्य आणि चव्हाण-राष्ट्रवादी यांच्यातले 'मैत्र' हे दोन्ही घटक संजय शिंदे यांना त्रासदायक ठरणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com