खासदार गायकवाडांची का सटकली?
पुणे-दिल्ली प्रवासा दरम्यान एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मोजून 25 वेळा सॅन्डलने मारल्यामुळे उस्मानाबादचे शिवसनेना खासदार प्रा. रविंद्र गायकवाड देशातच नाही तर जगभरात कुप्रसिध्द झाले आहेत. चूक कुणाची हे दिल्ली पोलिसांच्या अहवालानंतर स्पष्ट होणार असले तरी विमान कंपन्यांनी गायकवाडांवर घातलेल्या प्रवास बंदीने त्यांच्यावर मोटारीने प्रवास करण्याची वेळ आली आहे. प्रथमदर्शनी खासदारांची चूक दिसत असली तरी शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीली आहे. वारकरी सांप्रदायातील रविंद्र गायकवाड को गुस्सा क्यो आता है असाच प्रश्न त्यांच्या मतदारसंघातील लोकांना या निमित्ताने सध्या सतावतो आहे.
58 वर्षीय खासदार गायकवाड सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात वाढलेले. त्यांचे आजोबा उमरग्यातले जमीनदार तर वडील पेशाने वकील शिवाय सामाजिक कार्याची आवड असणारे. रविंद्र गायकवाड यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण उमरग्याच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात झाले. बी.कॉम., एम.कॉम. झाल्यानंतर नोकरी करता करताच त्यांनी बी.एड.चे शिक्षण पुर्ण केले. अनेक विषयांचे सखोल ज्ञान आणि चांगले वक्ते अशी त्यांची ख्याती.
या जोरावरच शिवजयंती निमित्त केलेल्या भाषणाने त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रभावित केले आणि ते शिवसैनिक व उस्मानाबादचे उपजिल्हाप्रमुख झाले. पण 1990 सालची पहिली विधानसभा निवडणुक त्यांना भाजपच्या चिन्हावर लढवावी लागली आणि नशिबी पराभव आला. 93 मध्ये किल्लारीत आलेल्या भूकंपात गायकवाडांनी जीवतोड मेहनत घेऊन पिडितांना मदत केली. 95 च्या विधानसभा निवडणुकीत त्याचे फळ त्यांना आमदारकीच्या रुपाने मिळाले. शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाल्यावर त्यांनी किल्लारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही काँग्रेसच्या पॅनलला धूळ चारली. शांत स्वभाव, कुठलेही व्यसन किंवा कुणाशी त्यांचे फारसे वाद झाल्याचे यापुर्वी ऐकिवात नव्हते.
काँग्रेस उमेदवाराच्या श्रीमुखात भडकावली
खासदार रविंद्र गायकवाड यांच्यावर उमरगा व उस्मानाबादेत विविध कलमाखाली 8 गुन्हे दाखल आहेत. पण हे गुन्हे राजकीय वैमनस्यातून दाखल करण्यात आल्याचे बोलले जाते. 2004 मध्ये रविंद्र गायकवाड दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडूण गेले. त्यावेळी काँग्रेस उमेदवाराचे समर्थक व शिवसैनिकांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती. तेव्हा गायकवाड यांनी काँग्रेस उमेदवाराच्या घरी जाऊन त्याला माफी मागण्यास सांगितले पण त्याने नकार दिला. तेव्हा पहिल्यांदा गायकवाड यांनी त्याच्या श्रीमुखात भडकावली होती. विशेष म्हणजे मारहाण केल्याची स्पष्ट कबुली देखील दिली होती.त्यानंतर दंगल भडकावल्या प्रकरणी गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. 2014 मध्ये रविंद्र गायकवाड खासदार झाले.
मुलाचा पराभव जिव्हारी लागला
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत उमरगा तालुक्यातील कुन्हाळी गटातून मुलगा किरण गायकवाड यांचा काँग्रेस उमेदवाराकडून पराभव झाला होता. हा पराभव खासदार गायकवाड यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. तेव्हापासून गायकवाड यांच्या स्वभावात चिडचिडेपणा आल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात 'खासदार शोधा, बक्षिस मिळवा' असा प्रचार विरोधकांकडून केला गेला. फोनवर गायकवाड कधीच उपलब्ध होत नाहीत अशी लोकांची तक्रार आहे. त्यातूनच उस्मानाबाद, उमरग्यातील मतदारांनी त्यांचे "नॉट रिचेबल' असे टोपण नाव ठेवल्याचे कळते.
जिल्हा परिषद अध्यक्ष व 23 मार्च रोजी सभापतीपदाची निवड होईपर्यंत खासदार गायकवाड हे उमरगा, उस्मानाबादेत होते. दुसऱ्या दिवशी ते पुणे आणि तिथून विमानाने दिल्लीला जातांनाच सॅन्डलने मारहाणीचा प्रकार घडला. तेव्हापासून ते आपल्या उमरग्यातील घरी आलेले नाहीत. गुढी पाडवा कुटुंबासह साजरा करण्यासाठी ते उमरगा येथे येणार असल्याची चर्चा होती. पण विमान प्रवासबंदीमुळे त्यांना घरी येता आले नाही. आता उस्मानाबाद व उमरगाकर आपल्या खासदाराची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

