शेतकरी नेते राजू शेट्टीचा दुसरा चेहरा... !

शेतकरी नेते राजू शेट्टीचा दुसरा चेहरा... !

मुळात राजू शेट्टी यांना सदाभाऊ खोत यांच्याबद्दल असूया निर्माण झाली आहे. आजपर्यंत आपलं ऐकणारा, संघटनेतला नेत्याची उंची गाठलेला हा कार्यकर्ता आता मंत्री झाला आणि शेतकऱ्यासाठी सत्तेच्या माध्यमातून काही तरी करू पाहतोय, त्याला शेतकऱ्यांमध्ये लोकप्रियता मिळतीय हेच शेट्टी यांना सहन झालेले नाही.
Published on

शेतकरी संपावरून सध्या राज्यभर घमासान सुरू आहे, शेतकरी हितासाठी बरेच नेते आणि काही पुढारी आंदोलनात उरले आहेत. 30 पेक्षा जास्त संघटना शेतकऱ्यांसाठी काम करत असल्याचं या काळात दिसून आलं आहे. अर्थात यापैकी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटना किती आणि कागदी पत्रके काढणाऱ्या संघटना किती हा प्रश्‍न आहे. (मात्र लेखाचा विषय तो नाही, त्यामुळे त्यावर चर्चा नको. ) सध्या एकाच प्रश्‍नावर माध्यमं आणि विविध वाहिन्यावरचे अँकर (हे स्वयंघोषित ज्ञानी आणि स्वतःला न्यायाधीश समजतात हा भाग वेगळा) चर्चा करत आहेत किंवा घडवून आणत आहेत ती म्हणजे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातल्या संबंधाचे काय होणार ? सदाभाऊ खोत संघटनेचा राजीनामा देतील की राजू शेट्टी त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बाहेर काढणार ? या सगळ्यात राजू शेट्टी, विविध भाषणं आणि मुलाखती यामधून शेतकरी हिताची भाषा करताना सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करताना ज्या काही गोष्टी सांगत आहेत त्या धक्कादायक तर आहेतच पण त्यांच्या शेतकरी हिताच्या मुखवट्याआडचा आतला भयावह चेहरा दाखवणाऱ्या आहेत. 

एका वाहिनीवरच्या मुलाखतीत त्यांनी असं सांगितलं की "" सदाभाऊ खोत माझ्याकडे आले तेव्हा फार अडचणीत होते, चळवळीत काय होईल, माझं कसं होईल अशी त्यांना चिंता होती मी त्यांना सांगितलं, तुम्ही काळजी करू नका आपण एका भाकरीत जेवू, माझ्यातली अर्धी भाकरी मी तुम्हाला देईन, तुम्ही काळजी करून नका, त्यानंतर मी त्यांना आमच्या पक्षाच्या कोट्यातून मंत्री केलं.'' ऐकणाऱ्या प्रेक्षकाला वाटेल की राजू शेट्टी किती महान आहेत, काय त्यांना कार्यकर्त्यांची कणव आहे. खोत किती कृतघ्न आहेत असे एखाद्याला वाटेल. पण मुळात सदाभाऊ खोत इतके दयनीय कधीच नव्हते आणि त्यांना मंत्रिपद मिळाले आहे ते त्यांनी आजवर केलेल्या चळवळीतल्या कामामुळे. राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी चळवळीत काम केलं आहे, मंत्रिपद मिळणे त्यांचा हक्क होता, राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कोल्हापूरच्या बाहेर विस्तार करण्यात सदाभाऊ खोत यांची भूमिका मोठी आहे, त्यांची तडाखेबंद भाषणे अनेकांना आवडायची. शेट्टीच्या संघटनेत खोत दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. राजू शेट्टी दाखवतात तशी मंत्रिपदाची त्यांच्यावर दया नव्हती तर खोत यांना ते पद मिळायला हवेच होते. इथं राजू शेट्टी नको त्या गोष्टी सांगून सांगून एकतर जनतेची सहानुभूती आपल्याकडे कशी येईल आणि सदाभाऊ कसे कृतघ्न आहेत हे ठसविण्याचा प्रयत्न करत होते. 

मुळात राजू शेट्टी यांना सदाभाऊ खोत यांच्याबद्दल असूया निर्माण झाली आहे. आजपर्यंत आपलं ऐकणारा, संघटनेतला नेत्याची उंची गाठलेला हा कार्यकर्ता आता मंत्री झाला आणि शेतकऱ्यासाठी सत्तेच्या माध्यमातून काही तरी करू पाहतोय, त्याला शेतकऱ्यांमध्ये लोकप्रियता मिळतीय हेच शेट्टी यांना सहन झालेले नाही. खरंतर शेट्टी यांची अपेक्षा केंद्रातल्या मोदी सरकारनं त्यांना मान द्यावा अशीच आहे. त्यामुळे ते राज्यमंत्रिमंडळात सहभागी झाले नाहीत. खासदार असल्याने मोदी यांनी दिल्लीत आपल्याला पद द्यावं, शरद जोशी यांच्याप्रमाणं आपल्याला एखाद्या समितीचं अध्यक्षपद द्यावं अशी त्यांची अपेक्षा असावी असेच त्यांचे आजपर्यंतचे वर्तन आहे. त्यांनी त्यांची इच्छा आजपर्यंत उघडपणे कधी बोलून दाखवलेली नाही पण मोदी सरकारची स्तुती करणारे शेट्टी अचानक मोदी सरकारवर टीका कशी काय करायला लागले त्यांच्या या वर्तनाची संगती कशी लावायची? 

खोत यांच्यासारख्या नगण्य माणसाबद्दल चर्चा काय करायची? असं उत्तर त्यांनी एका वाहिनीवरच्या मुलाखतीत एका प्रश्‍नाला दिलं. त्यातून त्यांची सरंजामी वृत्ती स्पष्ट व्हायला हरकत नाही. कालपर्यंत जो माणूस त्यांच्यासाठी राबत होता तो अचानक कसा नगण्य झाला याचं पटणारं कारण त्यांनी दिलेलं नाही. शेट्टी यांचं खरं दुःख हे आहे की त्यांनी सदाभाऊ खोत यांना संघटनेतून काढलं तरी त्यांचं मंत्रिपद जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण न काढता खोत संघटना सोडून कसे जातील आणि मग तेच संघटनेतून बाहेर पडले, त्यांनी संघटनेशी गद्दारी केली अशी हाकाटी पिटायला आपण मोकळे असा शेट्टी यांचा कावा आहे. कालच त्यांनी शेतकऱ्याबरोबरच्या एका मेळाव्यात खोत यांची गद्दार म्हणून संभावना केलीच आहे. 

शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी व सरकारशी वाटाघाटी करण्यासाठी जी नवी सुकाणू समिती नेमली गेली आहे त्यात काहींनी शेट्टी यांच्या समावेशाबद्दल आक्षेप घेतला. त्यावर लगेच माझी सुकाणू समितीतून बाहेर पडण्याची तयारी आहे अशी विधाने त्यांनी वाहिन्यावरच्या चर्चेत सुरू केली, शेट्टी यांनी राजकीय पक्ष काढला आहे आणि सुकाणू समितीत राजकीय पक्षांना स्थान नको अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे मग स्वतः शेट्टी यांनीच या समितीमधून कुठलीही चर्चा न करता बाहेर व्हायला हवं पण तसं न करता ते केवळ चर्चा करत आहेत. कारण शेतकरी संप मिटावा आणि त्याचं श्रेय मिळताना आपण त्या श्रेयात वाटेकरी असायला हवे अशी त्यांची इच्छा आहे. अशी इच्छा असायला कुणाचीच हरकत असता कामा नये पण शेट्टी ताकाला जाऊन भांडे लपवायचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळेच समितीतून ते बाहेर पडत नाहीत. 

शेट्टी यांनी शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण दिले त्यांनी शेतकऱ्यांसाठी किती परिश्रम घेतले हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. त्यांनी आक्रमक पद्धतीने आंदोलन केले मात्र त्यावेळी त्यांना साखर सम्राटांच्या साम्राज्यावर नाराज असलेल्यांची मदत झाली हे नाकारून चालणार नाही. आज खोतावर टीका करताना आणि त्यांना दुषणे देताना आपण शरद जोशींची शेतकरी संघटना का सोडली याचा विचार त्यांनी करावा. शरद जोशी जातीयवादी पक्षांच्या बरोबर जात आहेत म्हणून संघटना सोडणारे शेट्टी त्याच पक्षांबरोबर गेले हा इतिहास आहे. आता ते शेतकरी हितासाठी कॉंग्रेससारख्या सैतानाबरोबरही जाऊ म्हणत आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हाच सैतान त्यांना चालला आहे. वेळ येईल तशी पाठ फिरवायची आणि आपण करतो तेच राजकारण शेतकरी हिताचे असा त्यांचा खाक्‍या आहे. आपल्या कार्यकर्त्यांला मोठे करायचे आणि आपण मोठे व्हायचे असे नेत्याचे वर्तन असले पाहिजे पण आपल्या रिमोटवर सदाभाऊने चालले पाहिजे, आपला शब्द बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा संघटनेत चालला पाहिजे अशी शेट्टी यांची अपेक्षा आहे. पण तसे घडणार नाही. कारण शिवसेना हा पक्ष भावनेवर चालतो आणि बाळासाहेब ठाकरे हे वेगळेच नेते होते, शेट्टी यांनी ठरवले तरी त्यांना ती उंची गाठणे अवघड आहे. शेतकरी संघटनेतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांला शरद जोशी यांनी विचार करायला आणि प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून पुसून घ्यायला शिकवले होते, त्यामुळे खोत शेट्टी यांच्यापासून लांब गेले त्याचे शेट्टी यांनी वाईट वाटून न खोत आपल्यापासून का लांब गेले याचा जर विचार केला तर ते शेतकरी संघटनेच्या भल्याचे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल. खोत यांनी अजूनही शेट्टी यांच्याबद्दल अपशब्द काढलेला नाही शेट्टी मात्र एकेकाळी ज्या कार्यकर्त्याने आपल्यासाठी जीवाचे रान केले त्याची संभावना नगण्य आणि गद्दार म्हणून करतात हे मोठ्या नेत्याचे लक्षण नाही. हा संकुचितपणा आहे. आत्मक्‍लेष यात्रा काढणाऱ्या शेट्टी यांच्यासारख्या नेत्याला हे शोभणारे नाही. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com