राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, ज्येष्ठ नेते डाॅ. पद्मसिंह पाटील (Dr. Padamsinh Patil) यांचा आज वाढदिवस. उस्मानाबादच्या राजकारणावर घट्ट पकड असलेल्या पाटील यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठीही घेतले जात होते. तशी संधी त्यांना चालून आली होती. पण त्याऐवजी सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री झाले. आमदार, मंत्री आणि खासदार म्हणूनही पाटील यांचा दबदबा कायम राहिला. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ते कायम वावरले. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा त्याग करत भाजपमध्ये प्रवेश केला. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दलच्या भावना गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी व्यक्त केल्या आहेत. या आठवणी त्यांच्याच शब्दांत.
सन 1989-90 चा काळ होता. माझी डॉक्टर साहेबांशी ओळख कशी व कुठे झाली हेच मला आठवत नाही. कारण त्यांनी मला इतक जवळ केले कि, जणू काही मी त्यांच्या घरातलाच. निष्ठा काय असते हे खरतंर मी त्यांच्याकडूनच शिकलो. आपला नेता जे सांगेल ती लक्ष्मणरेषा.
सन 1991 साली श्री. शरद पवार साहेबांविरुद्ध महाराष्ट्रात काही जणांनी बंड केले. त्या बंडाला सामोरे जाताना मी त्यांना बघितले. एखाद्या कार्यकर्त्याने जे करावं ते डॉक्टर साहेब करत होते. आपल्या वयाचा विचार न करता त्यांच वागण मी स्वत:च्या डोळ्याने बघितले आहे. काँग्रेसच्या एका नेत्याचा हात पकडून फक्त दाबला तर त्या नेत्याच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे कुठल्या ताकतीने तो हात दाबला गेला असेल याचा विचार आपणच करावा. तेव्हाचे एक महासचिव जे या बंडात साहेबांच्या विरोधात होते ते एका केबिनमध्ये बसले असता फोन खणखणला. फोन जवळ डॉक्टर साहेब बसले होते. दोघांचाही हात फोन उचलायला गेला. डॉक्टरांनी फोन तर उचललाच, पण उचलता उचलता तो फोन त्या नेत्याच्या तोंडावर बसला. ते कस झाले असेल ते तुम्हीच समजून घ्या!
शरद पवार साहेब संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले. जाताना इथे मुख्यमंत्री कोण याची स्पर्धा सुरु झाली. पवार साहेबांच्या जवळ असलेल्या प्रत्येकाला वाटत होते कि डॉक्टर साहेबांनी मुख्यमंत्री व्हाव. मला त्यावेळेस हे गट तट काही माहितीच नव्हते. पण, त्यांच्या जवळ असल्य़ाकारणाने मलाही वाटत होते कि त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं. तसे त्यांनी संध्याकाळी मला सांगितले देखील कि, सकाळी लवकर ये आपले नाव होईल अस वाटतय. पण, नंतर जे काही झाले ते वेगळेच होते आणि श्री. सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री झाले. सुधाकरराव मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्यावेळेस बाबरी मशीद पडली. त्यानंतर राजकारणाला वेगळं वळण लागले. आणि परत एकदा डॉक्टर साहेब हे शरद पवार साहेबांसाठी सक्रिय झाले.
डॉक्टर साहेब आणि श्री. सुधाकरराव नाईक यांच्यामध्ये दुरावा कायम होता. त्याकाळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. रणजीत देशमुख हे होते. श्री. प्रणव मुखर्जी, श्री. जी. के. मुपनार आणि श्री. जनार्दन पुजारी हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक म्हणून पाठविण्यात आले होते. ह्या दोघांना भेटायला हायमाऊंट या शासकीय विश्रामगृहात सुधाकरराव नाईक आले. नाईक यांच्या जमावाने पवार साहेबांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली असता तिथे आमची झटापट झाली. मी आणि मदन बाफना आम्ही दोघेच त्या ठिकाणी उपस्थित होतो. झटापटीमध्ये सुधाकरराव नाईक यांना धक्का लागला आणि ते खाली पडले. ही तक्रार श्री. सुधाकरराव नाईक यांनी श्री. प्रणवकुमार मुखर्जी व श्री. जी. के. मुपनार यांच्याकडे केली. तिथून काही अंतरावर राहत असलेल्या डॉक्टर साहेबांना लगेच बोलाविण्यात आले. डॉक्टर साहेब आले आणि जाताना मला आणि मदन बाफनांना विचारले काय झाले ? आम्ही सर्व सविस्तर सांगितले. ते वरुन खाली आले आणि आमच्याकडे बघून हसले. तेवढ्यात मुंबई पोलिसांची गाडी आली. त्या गाडीमधील एकाने उतरून मला बोलावले. माझे नशीब चांगले कि, त्याचवेळेस डॉक्टरसाहेब खाली आलेले होते. मला पोलीस बोलवत आहेत हे बघितल्यानंतर ते स्वत:च पुढे आले आणि विचारले काय झाले? पोलीसांनी सांगितले कि आम्हांला यांना चौकशीसाठी न्यायचे आहे. त्यांनी त्यांच्याच स्टाईलमध्ये सांगितले. `ह्या घरातल्या भांडणात तुमचे काही काम नाही चला जा!,`` मला सांगितले गाडीत बस आणि मला स्वत:च्या निवासस्थानी घेऊन गेले.
त्यानंतर बरीच वर्षे आम्ही त्यांच्या सानिध्यात काम केले. ते जेव्हा पाटबंधारे विभागाचे मंत्री होते. तेव्हा ठाण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी मी त्यांच्याकडे हट्ट धरला. माझा बालहट्ट पूर्ण करण्यासाठी म्हणून मुंबईला देण्यासाठी 1952 साली चितळे आणि गोडबोले आयोगाने Notified (सुचविलेले) धरण हे त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या नावावरुन काढून घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या नावावर केले. हे धरण झाल तर 2040 पर्यंत ठाण्याचा पाणी प्रश्न मिटेल अशी परिस्थिती त्यावेळेस होती. त्यांनी कुठलेले आढेवेेढे न घेता ते धरण ठाणे महानगरपालिकेला देऊ केले. अर्थात त्यानंतर शासनामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये थोडेसे समज गैरसमज होत गेले आणि महापालिकेने ते धरण करण्यास नकार दिला.
अशा अनेक गोष्टी मला त्यांच्याबद्दल सांगता येतील. पण, त्यांच्या सानिध्यातील दिवस हे कधीच विसरता येणार नाहीत. राष्ट्रपती बाजूला उभे आहेत. बाजूला श्री. शरद पवार साहेब उभे आहेत. दोघेही विमानतळावरती आहेत आणि डॉ. पद्मसिंह पाटील त्यांच्या बाजूलाच उभे राहून मी बाहेर गर्दीत उभा असतांना पटकन ओरडून म्हणाले ‘बंटी आतमध्ये ये’ हे मी कधीच विसरणार नाही. मला आजही आठवते कि, 9 मे 1991 रोजी मी औरंगाबाद येथे होतो. राजीव गांधी हे औरंगाबादला प्रचारासाठी आले होते. आतमध्ये राजीव गांधी, राजीव गांधी यांचे मित्र सुमन दुबे, पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष श्री. निलंगेकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील हे आतमध्ये बसलेले होते. पटकन बाहेर एक पोलीस धावत आला आणि माझ्या कानात येऊन म्हणाला तुम्हांला आतमध्ये बोलावले आहे. आतमध्ये डॉ. साहेबांनी मला बोलावून घेतले आणि जवळ-जवळ 1 तास राजीव गांधी यांच्याबरोबर श्री. शरद पवार साहेब गप्पा मारत असतांना मी शांतपणाने हे सगळं बघत होतो. हे सगळं केवळ डॉक्टर साहेबांमुळेच माझ्या आयुष्यात घडले. इतका मनाने मोठा, निर्मळ माणूस माझ्या आयुष्यात आला हे मी माझे भाग्यच समजतो. त्यांचे चालणे, त्यांची व्यायामाची छाती हे सगळे त्यांच्या व्यक्तीमत्वाला शोभेसे होते.
हे सगळं असताना देखिल त्यांची मातृभक्ती ही वाखणण्याजोगी होती. एवढा मोठा कॅबिनेट मिनिस्टर, त्यांचा संपूर्ण राजकीय वर्तुळातील दरारा हे सगळं असताना त्यांच्या आईला ते दररोज संध्याकाळी फिरायला घेऊन जायचे. त्यांच्या बिल्डिंगला लिफ्ट नव्हती. आई तिसऱ्या माळ्यावर भावाबरोबर राहायची. डॉक्टर साहेब तिला स्वतःच्या पाठीवर उचलून घेऊन खाली आणायचे. आणि फिरायला घेऊन जायचे व परत उचलून घेऊन घरी आणून सोडायचे. हे सगळ एका माणसाच्या व्यक्ती चारित्र्यामध्ये असणं ह्याच मला आश्चर्यच वाटत.
त्यांच्या स्वभावामुळे राजकारणात त्यांची दहशत तर होतीच. पण, स्वकियांबरोबरच विरोधकांमध्येही आदरयुक्त भीती होती. मला खरतर श्री. शरद पवार साहेब यांच्या दारात दोन माणसे घेऊन गेली त्यांना मी कधीही विसरु शकत नाही. एक म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील आणि दुसरे म्हणजे सुरेश कलमाडी.
आज डॉक्टर साहेबांचा वाढदिवस आहे. थकलेले डॉक्टर साहेब यांचा आवाज ऐकला कि, मन अस्वस्थ होतं. आजही मुंबईला कुठलिही राजकीय हालचाल झाली कि, सकाळी 6 ते 7 च्या मध्ये त्यांचा फोन येणार आणि परिस्थितीबद्दल विचारणा करणार. त्यांच्या मनातलं साहेबांविषयीचे प्रेम हे त्यांच्या प्रत्येक शब्दांत आजही दिसून येते. त्यांची प्रकृती ठणठणीत राहो आणि ते शतकवीर होवो ह्याच शुभेच्छा ! कारण आजच्या जगात अशी माणसे फार कमी आढळतात.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.