पत्रकारांच्या दृष्टिकोनातून पतंगराव.... 

राज्याच्या राजकारणात सातत्याने चर्चेत राहिलेला "न्यूज मेकर' नेता म्हणजे पतंगराव. कॉंग्रेस अंतर्गत घडामोडी असोत, मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री निवड असो, या प्रक्रियेत पतंगरावांचे नाव नेहमी आघाडीवर राहायचे... बिनधास्त बोलणे आणि जे करायचे ते भव्य, दिव्य आणि उत्तुंग असं वेड असलेले ते नेते होते. त्यांनी उभारलेल्या भारती विद्यापीठाच्या पुण्यापासून अगदी कडेगावपर्यंतच्या इमारतीत भव्यतेची प्रचिती येते. अफाट जनसंपर्क ही पतंगरावांची मोठी सामाजिक "ऍसेट'. ती त्यांच्या पश्‍चातही आभाळाएवढ्या स्मृतीत आमच्या मातीतला एक असाही जादूई नेता होता, याचे स्मरण पुढील पिढ्यांना देत राहील.
Patangrao_20Kadam
Patangrao_20Kadam

आमच्या पत्रकारांच्या नव्या पिढीला पतंगरावांसारखा राजकारणी समजून घेणे आव्हानात्मक होते. कॅबिनेट झाली की, साहेब मुंबई-पुण्यात रमायचे नाहीत, आपल्या खात्याचा कोणताही मोठा निर्णय ते थेट सांगलीच्या पत्रकारांसमोर येऊनच जाहीर करायचे. ते आले की, हमखास सकाळी माहिती अधिकाऱ्यांचा निरोप यायचा, "साहेबांनी प्रेस ठेवली आहे.'' सकाळी सात वाजता पत्रकारांना जागा करणारा हा एकमेव नेता असावा... कारण त्यांचा दौराच एवढा फास्ट असायचा की सकाळी अर्ध्यातासाची प्रेस झाली ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना व्हायचे.

 कितीही मोठा विषय असो माहिती देताना अधिकाऱ्यांना टिपणे लागायची, पण पतंगरावांनी कधीही हातात एखादा कागद घेऊन माहिती दिल्याचे आठवत नाही. टेंभूसाठी किती आणि ताकारीसाठी किती निधी आणला याचे आकडे त्यांचे तोंडपाठ असायचे. अख्ख्या कॅबिनेटमधील महत्त्वाच्या निर्णयाची जंत्री ते काही मिनिटात सांगून टाकायचे.

त्यांचा माहितीचा वेग पत्रकारांनाही आवरायचा नाही आणि कामाचा भार प्रशासनाला पेलायचा नाही. एवढे विषय ते एकाच प्रेसमध्ये सांगून टाकायचे. प्रत्येक पत्रकाराला नावानिशी ओळखायचे आणि कितीही अडचणीचा प्रश्‍न असला तरी थट्टा मस्करी करत विषय टोलवायचे. अनेकदा विरोधातल्या प्रश्‍नावर ते संतापायचे... पण दुसऱ्या बैठकीत ते विसरून जात, त्या पत्रकाराच्या खांद्यावर हात ठेवून "काय बरा आहेस ना'', म्हणून आस्थेने चौकशी करायचे. 

त्यांच्या कामाचा वेग हा प्रशासनापुढचे आव्हान होते. तासाभरात पाच-सात विभागांच्या मिटिंग आटपून ते पुढच्या दौऱ्यावर निघायचे. आयुष्यभर कॉंग्रेसशी निष्ठावान राहिलेला हा नेता वास्तववादी होता. उगाच आपल्याच पक्षाच्या किंवा सरकारच्या कोड कौतुकात ते कधी रमायचे नाहीत. कॉंग्रेसमध्ये काहीही घडू शकते याचं भान असणारा हा नेता होता.

स्वत:ला न पटणारा निर्णय दिल्लीहून आला तरी पक्षासाठी मनापासून राबणारा हा नेता होता. हाफिज धत्तुरे यांच्यासारख्या नवख्या आणि सामान्य परिस्थितीतून आलेल्या उमेदवारामागे ताकद लावणे असो किंवा लोकसभेचे तिकीट मिळाल्यानंतर प्रतीक पाटलांसाठी यंत्रणा राबविणे असो पक्षातील दादा-कदमगट हे मतभेद टाळून ते कामाला लागायचे.

 गटतटांबद्दल विचारलं की ते चिडायचे... कॉंग्रेस एक खळखळता प्रवाह असल्याचे ठासून सांगत. दादा कसे काम करायचे, याचे दोन-चार किस्से ऐकवून हा सवालच टोलवून द्यायचे. सरकारमध्ये मंत्री असूनही ते नेहमी म्हणायचे,"अरे प्रशासन म्हणजे अजगरासारखे असते. त्याला हलवून जागे करावे लागते.'' मंत्रालयातही साहेबांचा हाच खाक्‍या होता. ते थेट सचिवाच्या केबिनमध्ये ठाण मांडून लाल फितीत अडकलेल्या फाईलींना मार्गी लावायचे. पालकमंत्री म्हणून प्रदीर्घ काळ त्यांना सांगली जिल्ह्यासाठी कामाची संधी मिळाली.

 अनेकदा ते आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून टीकेचे लक्ष्य व्हायचे, पण टीकेमुळे विचलित न होता त्यांचा खास भाषेत बिनधास्त समाचार घ्यायचे. आघाडीची सत्ता गेल्यानंतर त्यांची प्रतिक्रियाही बोलकी होती. राष्ट्रवादीला उद्देशून ते नेहमी म्हणायचे,"गमजा कराताय ना, आता बसा विरोधी बाकावर.'' कार्यकर्त्यांना धीराने जाण्याचा सल्ला देताना ते "सत्ता काय, अशा किती आल्या आणि किती गेल्या, पण लोकांशी नाळ जोडा,'' असे ते नेहमी बजावायचे.

 कोणालाही ऐकेरी हाक मारण्याची त्यांची शैली वेगळी होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनाही विधिमंडळात,'अरे देवेंद्र' अशी हाक मारणारे ते एकमेव नेते होते. त्यांनी जपला तो लोकसंग्रह किती अफाट होता, ते 3 मार्चला साऱ्या राज्याने अनुभवले. सूर्यास्त होताना सोनहिरा कारखान्याच्या प्रांगणात या सोनहिऱ्याचाही अस्त सर्वांच्या डोळ्यात आसू उभा करून गेला.

यावेळी जमलेला अफाट जनसागर ही पतंगरावांची मोठी 'सामजिक ऍसेट' आहे. ती त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या आभाळा एवढ्या स्मृतीत आमच्या मातीतला एक असाही जादूई नेता होता याचे स्मरण पुढील पिढ्यांना देत राहील. 


त्यांनी सांगलीत महापालिकेसमोर उभारलेली भारती विद्यापीठाची इमारत, मिरज रस्त्यावरील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय या गोष्टी त्यांच्या भव्यतेची साक्ष देत राहतील. कोणतीही गोष्ट करताना त्यात भव्यता, उत्तुंगता आणि ते करण्यासाठीची गतिमानता आणि बिनधास्तपण यातून एक जादूई राजकारणी लोकांनी अनुभवला. आता तो आपल्यातून गमावलाय याची खंत सतावत राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com