मुंबईचं फुप्पुस वाचणार की मेट्रो कारशेड ?

मुंबईच्या गोरेगावच्या आरेच्या जंगलात उभारण्यात येणाऱ्या मेट्रो 3 कारशेडचा विरोध टोकदार बनू लागलाय. काय आहे हा वादाचा मुद्दा? आरेचे जंगल वाचणार की कारशेड? असा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे. मुंबईतील राजकारण आणि समाजमन ढवळून काढणाऱ्या आरे कारशेडच्या निमित्ताने...
mumbai arrey
mumbai arrey

नाणारचे झाले तेच मेट्रोचे होणार अशी भुमिका घेतली आहे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी. त्यामुळे मेट्रो विरोधाला आता बळकटी आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर गोरेगावातील आरेचे जंगल की मेट्रोचे कारशेड ? या वादाने राजकारण आणि समाजमन ढवळून निघाले आहे.

मेट्रो - 3 कारशेड वरून वाद पेटलाय. गानसम्राज्ञी लता मंगशकर, बीग बी अमिताभ बच्चन यांनी या वादात उडी घेतली. कॉंग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी आरेतील वृक्षतोडीविरोधात शिवसेनेच्या भुमिकेला पाठिंबा दिला आहे. 

आरेतील नागरिक, पर्यावरण प्रेमी संस्था, संघटना, आदीवासी कारशेडच्या विरोधात एकवटले आहेत. हा वाद उच्च न्यायालयात गेला आहे. सुमारे 17 याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

न्यायालयाने हस्तक्षेप केल्याने पालिकेने 2700 झाडे तोडण्याचा वृक्ष प्राधिकरणाचा निर्णय स्थगित करावा लागला. मात्र पर्यावरणवाद्यांनी तसेच राजकीय पक्षांनी कितीही विरोध केला तरी आरे परिसरातच कारशेड होईल अशी ठाम भुमिका मुंबई मेट्रोच्या प्रकल्प संचालक अश्‍विनी भिडे यांनी घेतल्याने वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. 

मुंबईतील वाहतूक कोंडीने मुंबईकरांची तसेच जीवाची मुंबई करणारांची दमछाक होत आहे. मेट्रोने वाहतूक वेगवान होईल. दळणवळण वेगवान झाले की शहराचा विकास झपाट्याने होतो. विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी मुंबईतील वर्सोवा ते घाटकोपर या 11 किलोमीटरचा पहिला मेट्रो मार्ग बांधून सुरू केला.

या पाठोपाठ मेट्रो 3 हा कुलाबा - वांद्रे - सिप्स हा विस्तारित मार्ग तयार करण्यात येत आहे. या टप्प्यासाठी कारशेड बांधण्याची गरज आहे. त्यासाठी आरेच्या जंगलाचा भाग घेण्यात येणार आहे. मात्र कारशेडमुळे या भागातील वन आणि वन्य जीवन नष्ट होईल, मुंबईच्या पर्यावरणाचा समतोल ढासळेल. मुंबईला पुराचा धोका उद्भवेल, अशी भिती स्थानिकांना तसेच पर्यावरणवाद्यांना वाटत आहे. त्यामुळे कारशेडचा विरोध अधिक तीव्र होवू लागला आहे. 

गेल्या चार वर्षापूर्वी कारशेडबाबत चर्चा सुरू झाली आणि तेव्हापासूनच कारशेडला विरोध करीत "सेव्ह आरे' ही मोहिम सुरू झाली. मेट्रोचे कारशेड कांजूरमार्गच्या जागेत असावे अशी मागणीही जोर धरू लागली आहे. मेट्रो प्राधिकरणाने मार्च 2005 मध्ये कांजूरच्या जागेची मागणी केली होती. मात्र जागा उपलब्ध झाली नाही.

अखेर डिसेंबर 2016 मध्ये राज्य शासनाने मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जागेची निवड केली. मेट्रोच्या 30 हेक्‍टर जागेपैकी 25 हेक्‍टर जागेवर कारशेड बांधण्याचे येत्या ऑक्‍टोबरपर्यंतचे नियोजन होते. 2021 मध्ये मेट्रो 3 पूर्ण क्षमतेने कार्यरत करण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र मेट्रो कारशेडसाठीचा विरोध पाहता न्यायालयाच्या परवागीनेच काम सुरू होणार असल्याचे सद्यातरी दिसत आहे. 

आरेचे जंगल हे मुंबईचे फुफ्फुस मानले जाते. नव्वदीच्या दशकानंतर पसरणारी मुंबई उभी राहताना कॉंक्रीटचे जंगल फोफावत गेले. आरेचे एवढे मोठे जंगल मुंबईत आहे हे मेट्रो 3 च्या कारशेडमुळे जगापुढे आले. 1288 हेक्‍टर जागेत हे जंगल व्यापले आहे. त्यात आरे दुध डेरीचा 104 चौरस किमीचा भाग व्यापला आहे. 1980 पासून या जंगलाचे तुकडे पाडून तेथे कॉंक्रीटचे जंगल उभे राहण्यास सुरूवात झाली. हा जंगलपट्टा बिल्डरांना हवा हवासा वाटतोय. 

या जागेत 27 आदिवासी पाडे आहेत. त्या पाड्यांमध्ये आदिवासींच्या अनेक पिढ्या गेल्या. या जंगलाचे तेच राखणदार आहेत. या जंगलाला दरवर्षी आग लागते. आगीवरून निर्माण होतात ते फक्त संशयकल्लोळ. पुढे काहीही होत नाही.

मेट्रो कारशेडच्या विरोधाचा कल्लोळ गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाला आहे. कारशेड विरोध वाढत आहे. असे असताना मुंबईतील लोकप्रतिनिधी गप्प का ? मुंबईतील नगरसेवक, आमदार, खासदार कुठे आहेत. निवडणूकीच्या राजकारणात कारशेडचा विषय प्रचाराचा मुद्दाही ठरेल. 

या प्रश्‍नाने राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी शिवसेना कॉंग्रेस विरूध्द भाजप असे दिसत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरूद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे काहीसे चित्र या विषयाने निर्माण केले आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयावर कारशेडचे भवितव्य अवलंबून आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com