Indian national congress : लोकसभा निवडणुकीला वर्ष-दीड वर्षाचा अवधी असताना काँग्रेस (congress)नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो पदयात्रा सुरू केली आहे. या पदयात्रेचे केरळ, तमिळनाडू, कर्नाटक,आंध्र प्रदेश व तेलंगणा या पाच राज्यात मोठ्या प्रमाणात स्वागत झाले आहे. ही यात्रा सध्या दिल्लीत आहे. आज काँग्रेसचा १३८ वा वर्धापनदिन आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) काय सुरु आहे, हे जाणून घेऊया! (congress Latest news)
अनेक वर्ष काँग्रेसला अध्यक्ष नसल्यामुळे नेतृत्वहीन पक्ष म्हणून काँग्रेसवर विरोधक टीका करीत होते. काँग्रेसला नुकताच मल्लिकाअर्जुन खर्गे यांच्यासारखा ज्येष्ठ नेता अध्यक्षपदी मिळाला आहे. पण त्यांच्या कारकिर्दीत दिल्ली नगरपालिका, आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही. काँग्रेसच्या मुख्य नेतृत्वाची पकड घट्ट नसल्यामुळे अशी परिस्थिती झाली अशी टीका आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेस ही गटातटामध्ये विभागलेली दिसते. काँग्रेसच्या स्थापनेपासून महाराष्ट्र हा खरा तर काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो, पण सध्या महाराष्ट्रात काँग्रेसची परिस्थिती फारशी चांगली नाही. काँग्रेसमधील गटबाजीला शमवण्यासाठी सोनिया गांधी यांनी काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पाठवून ज्यांना मुख्यमंत्री बनवले होते, ते पृथ्वीराज चव्हाण तर प्रभावहिन होऊन बसले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही प्रभाव राज्यभर दिसत नाही. पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण या दोघांनाही पक्षात नवीन प्राण फुंकणे शक्य होताना दिसत नाही.
काँग्रेसला महाराष्ट्रात पुन्हा 'सोनिया'चे दिवस आणण्यासाठी सोनिया गांधी यांनी नाना पटोले यांच्याकडे काँग्रेसची धुरा दिली. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पटोले यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथम काँग्रेसच्या स्वबळाची रणगर्जना केली. पण अल्पावधीतच ते बरेच थंड झालेले दिसले. कारण स्वबळाची भाषा करणे वेगळे आणि प्रत्यक्ष स्वबळावर निवडणुका लढणे वेगळे असते. राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस घटक पक्ष सामील झाल्याने काँग्रेसचा आवाज दाबला गेल्याचे खासगीत बोलले जाते.
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे काँग्रेस हा जेव्हा तो अशा कुठल्या आघाडीला पाठिंबा देतो किंवा त्यात सहभागी होतो, तेव्हा तो फार काळ त्यांच्यासोबत राहत नाही. कारण त्यामुळे प्रादेशिक पक्षांना बळ मिळू काँग्रेस दुर्बल होते. सध्या राज्यात (महाराष्ट्र) तसेच होत आहे. आघाडीत काँग्रेस सत्तेत सहभागी होती, मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आणि उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. राष्ट्रीय पक्ष असलेल्या आणि एकेकाळी महाराष्ट्रात अजिंक्य असलेल्या काँग्रेसला आज आघाडीमध्ये महाराष्ट्रात दुय्यम भूमिका घ्यावी लागत आहे.
आघाडीतून बाहेरही पडता येत नाही. कारण राष्ट्रीय पातळीवर पक्षाची परिस्थिती समाधानकारक नाही. त्यात पुन्हा महाराष्ट्रात आपण सत्तेतून बाहेर पडलो तर भाजपचे फावेल. त्यामुळे मोदी आणखी शिरजोर होतील. त्यामुळे राज्यात सत्तेचे मुख्यपदही मिळवता येत नाही आणि सत्तेतून बाहेरही पडता येत नाही, अशा पेचात काँग्रेस सापडलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केली, पण ते बोलण्याइतके सोपे नाही.राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले. यात महाविकास आघाडी सरकारमध्ये घटक पक्षात असलेला काँग्रेस पक्ष काहीसा पिछाडीवर पडलेला दिसतो.
विचारसरणीला फटका
महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या काँग्रेसला दुय्यम भूमिका घेऊन सत्तेत सहभागी व्हावे लागेल होते, यालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही प्रमाणात जबाबदार आहेत. कारण २०१९ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपकडे केली आणि आपली भूमिका ठाम ठेवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेऊन राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या मिळून महाविकास आघाडीचा अभिनव प्रयोग केला. ज्या आघाडीत शिवसेना आहे, त्यात काँग्रेसला सहभागी व्हायचे नव्हते. कारण ते शिवसेनेला जातीयवादी आणि प्रांतवादी पक्ष मानतात. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील सर्वधर्मसमावेशक विचारसरणीला त्याचा फटका बसतो. पण शरद पवारांनी काँग्रेसला विश्वासात घेतले अन् काँग्रेस आघाडीत सहभागी झाली. पण काँग्रेसमध्ये अंतगर्त याला विरोध आहे.
नाना पटोलेंचे व्यक्तिमत्व आणि वक्तृत्व आक्रमक, तगडे आहे. त्याचा उपयोग राज्यातील काँग्रेसला तगडे बनवण्यात होईल,असे वाटत होते.पण पटोलेंच्या आक्रमकतेची धार बोथट झालेली दिसते.
काँग्रेसचे तुकडे कसे जोडणार
नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासारखे बडे नेते काँग्रेसला पुन्हा एकसंघ करतील का, स्थानिक पातळीवरील गट-तट संपविणे सध्या काँग्रेससमोर मोठे आवाहन आहे.राहुल गांधी यांची 'भारत जोडो' पदयात्रा सुरु असली तरी काँग्रेसची अंतगर्त झालेले तुकडे कसे जोडता, येईल, हा पक्षासमोरचा मोठा प्रश्न आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.