अल्पकाळाचे सरकार हा कर्नाटकला शापच; केवळ तीनदाच पाच वर्षांचा मुख्यमंत्री

सत्तेवर आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच आरोग्य तोळामासा राहिलेल्या कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीच्या एच. डी. कुमारस्वामी सरकारने अवघ्या चौदा महिन्यात अखेरचा श्‍वास घेतला. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण न करताच गडगडलेले आणखी एक सरकार अशीच कर्नाटकाच्या इतिहासात आता कुमारस्वामी सरकारची नोंद होईल.
अल्पकाळाचे सरकार हा कर्नाटकला शापच; केवळ तीनदाच पाच वर्षांचा मुख्यमंत्री

चार-पाच दिवस कुमारस्वामी यांचे सरकार राहणार की जाणार यावर विधानसभेत चर्चा झडत होती. अखेर मंगळवारी निर्णय झाला आणि कर्नाटकाच्या इतिहासातील एका राजकीय 'दोडाट्ट'चा (महानाट्य) अंत झाला. मे 2018 मध्ये सत्तेवर आलेल्या सरकारला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. तत्पूर्वी केवळ सहा दिवस भाजपचे मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर आलेल्या बी. एस. येडियुराप्पा यांना बहुमत सिद्ध करता आले नाही आणि ते राजीनामा देऊन पायउतार झाले. त्यानंतर मुख्यमंत्रीपदावर दावा करत कुमारस्वामी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेवर आले. 

त्यानंतर वर्षभरात कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने एकमेकावर कुरघोडी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. पोटनिवडणुकीत, तसेच लोकसभा निवडणुकीत आपल्याच युतीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी विरोधकांना म्हणजे भाजपला रसद पुरवली. त्यातूनच सरकार खिळखिळे होत गेले तर तिकडे भाजपने जोर लावला. अखेर कुमारस्वामी सरकारची इतिश्री झाली.

कुमारस्वामी हे पहिल्यांदा भाजपच्या पाठिंब्यावर तीन फेब्रुवारी 2006 ते 8 ऑक्‍टोबर 2008 या काळात मुख्यमंत्री बनले. त्यावेळी ते एक वर्ष आणि 253 दिवस सत्तेवर राहिले. पण यंदा सत्तेवरुन पायउतार होताना 23 मे 2018 ते 23 जुलै 2019 म्हणजे एक वर्ष आणि 61 दिवस सत्ता चाखावयास मिळाली. म्हणजे तसे कुमारस्वामी सरकार पुन्हा औटघटकेचेच ठरले.

राज्य पुनर्रचनेनंतर म्हैसूरचे (त्यावेळचे कर्नाटकाचे नाव) मुख्यमंत्री म्हणून एस. निजलिंगाप्पा यांनी 21 जून 1962 ते 28 मे 1968 अशी पाच वर्षे 342 दिवस सत्तेवर राहिले. म्हैसरचे "कर्नाटक राज्य' असे नवे नामांतर झाल्यानंतर डी. देवराज अर्ज 20 मार्च 1972 ते 31 डिसेंबर 1977 याकाळी मुख्यमंत्री पदावर होते. ते पाच वर्षे 286 दिवस मुख्यमंत्री पदावर राहिले. त्यानंतर अलिकडे म्हणजे 13 मे 2013 ते 15 मे 2018 हा पाच वर्षांचा कार्यकाळ सिद्धरामय्या यांनी पूर्ण केला. त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे आणि दोन दिवस काम करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे ही तिन्ही सरकारे कॉंग्रेसची होती.


आतपर्यंतचे औटघटकेचे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री                                  दिवस                   कालावधी
-बी. एस. येडियुराप्पा (भाजप)   सहा दिवस     17 मे 2018 ते 23 मे 2018
-बी. एस. येडियुराप्पा (भाजप)   सात दिवस     12 नोव्हेंबर 2007 ते 19 नोव्हेंबर 2007
-कडिडाळ मंजाप्पा (कॉंग्रेस)     73 दिवस     19 ऑगस्ट 1956 ते 31 ऑक्‍टोबर 1956
-एस. आर. कंठी (कॉंग्रेस)          98 दिवस    14 मार्च 1962 ते 20 जून 1962


वर्षाच्या आतील मुख्यमंत्र्यांची कारकीर्द
मुख्यमंत्री                               दिवस                          कालावधी
-रामकृष्ण हेगडे (जनता पक्ष)      342         8 मार्च 1985 ते 13 फेब्रुवारी 1986
-एस. आर. बोम्मई (जनता पक्ष)   281        13 ऑगस्ट 1988 ते 21 एप्रिल 1989
-वीरेंद्र पाटील (कॉंग्रेस)              314       30 नोव्हेंबर 1989 ते 10 ऑक्‍टोबर 1990
-डी. व्ही. सदानंदगौडा (भाजप)   341         5 ऑगस्ट 2011 ते 11 जुलै 2012
-जगदीश शेट्टर (भाजप)             304        12 जुलै 2012 ते 12 मे 2013
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com