2014 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी विरोधकांना धोबिपछाड देत भाजपला प्रचंड बहुमत बहाल केले होते. खुद्द भाजपलाही अपेक्षित नव्हते ऐवढ्या मोठ्या संख्येने भाजप उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने देशातील जनतेने लोकसभेत पाठविले.
हा निकाल विरोधकांसाठी मोठा धक्का होता. 2014 च्या निवडणुकीत मिळालेल्या निर्विवाद विजयाचे श्रेय भाजपने "मोदी लाटे'ला दिले होते. त्याच वेळी हा विजय भाजपने ईव्हीएममध्ये छेडछाड करून मिळवला असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येऊ लागला.
लोकसभेनंतर झालेल्या काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपची घोडदौड कायम राहिली. त्यामुळे सातत्याने पराभवाची नामुष्की सहन करणाऱ्या विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या छेडछाडीचा मुद्दा पुढे करण्यास सुरवात केली. विरोधक ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मतदानासाठी ईव्हीएमचा वापर न करता पारंपरिक बॅलेट पेपरच्या वापराचा आग्रह धरला.
त्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील जवळजवळ सर्वच विरोधी पक्ष आघाडीवर होते. मात्र, ईव्हीएमच्या मुद्यावर विरोधकांनी चांगलेच रान पेटविले होते. मात्र, काही राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव आणि कॉंग्रेसचा विजय झाला.
दरम्यानच्या काळात विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळांनी निवडणूक आयोगाचे उंबरठे झिजवत ईव्हीएम नकोच, अशी मागणी रेटण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले.
आज लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्तांनी सर्व मतदान केंद्रावर ईव्हीएमच्या जोडीने व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्याची घोषणा केली. सर्वच ठिकाणी व्हीव्हीपॅट वापरण्याच्या निर्णयामुळे विरोधकांच्या आरोपांमधील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे.
आता सर्वत्र व्हीव्हीपॅटचा वापर करण्याचा आयोगाच्या प्रयोग किती यशस्वी होते, याकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे. तर दुसरीकडे या निर्णयामुळे विरोधकांचे समाधान झाले की नाही हे पाहण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे.
एक तर ईव्हीएमबाबतचे संशयाचे धुके कमी होण्यासाठी हा निर्णय कारणीभूत ठरू शकतो किंवा पुन्हा निवडणुकीत पराभवच वाट्याला आला तर विरोधकांचे ईव्हीएममध्ये छेडछाडीचे तुणतुणे त्यापुढेही सुरूच राहू शकते.
खरेतर लोकसभेचे मैदान आता गाजणार आहे. सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. प्रचार शिगेला पोचेल. आरोप-प्रत्यारोप होतील. देशात पुन्हा मोदी सत्तेवर येऊ नयेत यासाठी कॉंग्रेससह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.
मात्र मोदीही काही कमी नाहीत. विरोधकांना ते सत्तेच्या जवळपासही फिरकू देणार नाहीत, असा दावा त्यांच्या पक्षाची मंडळी करीत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे भारताने पाकमध्ये घुसून हल्ला केल्याने देशातील जनतेच्या मनात पुन्हा एकदा मोदींविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला आहे, असे मोदींच्या समर्थकांना वाटते.
भारत - पाकिस्तान दरम्यान मागील काही दिवसांमध्ये जे घडले त्याचे परिणाम लोकसभा निवडणुकीत निश्चितपणे दिसून येतील. विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेनंतर देशातील प्रत्येक नागरिकांची मान अभिमानाने उंचावली.
भारताने केलेल्या पाकमधील सर्जिकल हल्ल्यानंतर भाजपने दोनशे - अडीचशे दहशतवादी मारल्याचा दावा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. मात्र या हल्ल्यात किती दहशतवादी मारले याचे पुरावे सरकारने दिलेले नाहीत. दुसरीकडे साडे तीनशे ते चारशे दहशतवादी मारल्याचा दावा विविध माध्यमांनी केला होता. माहितीमधील विसंगतीमुळे वादाला फोडणी मिळाली आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पुलवामा हल्लाप्रकरणी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. जर पाकिस्तानची दहा जरी माणसे मारली गेली असती तर अभिनंदन सुटलेच नसते, असे त्यांचे म्हणणे होते. राज यांच्याप्रमाणेच कमी-अधिक प्रमाणात हाच सूर मोदी विरोधक लावत आहेत.
इतके मात्र खरे की भारतीय जनतेला आपल्या लष्करावर केलेली टीका रुचत नाही. तुमचे तुम्ही राजकारण करा पण, लष्कराच्या कृतीवर शंका घेऊ नका, असे त्याला वाटते. काही असले तरी मोदींनी पाक विरोधात पाऊल उचलले, शत्रू राष्ट्राला तेच धडा शिकवू शकतात, असा संदेशही लोकांमध्ये गेला, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात पाहण्यास मिळते.
ईव्हीएम मशिनवर विरोधक आज शंका घेत आहेत. मग, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थानात कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाला कशी काय सत्ता मिळाली यावर मात्र विरोधक मूग गिळून गप्प असतात. मोदी सत्तेवर येण्यापूर्वी देशात कॉंग्रसेची सलग दहा वर्षे सत्ता कशी काय आली? असले प्रश्न कॉंग्रेसला विचारलेले आवडत नाहीत.
भाजप काय किंवा कॉंग्रेस काय सर्वच पक्ष आपल्या सोयीच्या भूमिका घेत असतात. मतदारराजांवर मोहिनी टाकण्याचा प्रयत्न करतात. काही झाले तरी मोदी नको यासाठी सर्वच विरोधक एकवटले आहेत.पण, निवडणुका कशी जिंकायचे याचे तंत्र भाजपला गवसले आहे. लोकसभेचे घोडामैदान जवळच आहे. तेव्हा कळेच "कोण कितना पाणी में है !' विरोधकांचा मोदी द्वेष एकवेळ समजून घेता येईल. मात्र ईव्हीएमचा द्वेष कशासाठी ?
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.