गिरीश महाजनांची व्यूहरचना शिवसेनेची मुसंडी रोखू शकेल?

महापालिकेसाठी शिवसेनेकडे आक्रमक धोरण तर भाजपचा राजकीय गोंधळ अशी स्थिती आहे.
Girish Mahajan, Jaykumar Rawal, Bhausaheb Choudhary & Sanjay Raut
Girish Mahajan, Jaykumar Rawal, Bhausaheb Choudhary & Sanjay RautSarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

नाशिक : भाजपच्या (BJP) तीन नगरसेवकांनी शिवबंधन बांधले. एक अपक्ष नगरसेवकही शिवसेनेत (Shivsena) दाखल झाला. त्यामुळे सुसाट सुटलेल्या शिवसेनेच्या मते ही सुरवात आहे. अर्थात सतत अॅक्टीव्ह, सजग असलेला भाजप त्यामुळे जागा झाला. त्यांनी नाशिकचे प्रभारी जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांचा कार्यभार आक्रमक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे दिला. आता ते शिवसेनेला रोखणार का? ही चर्चा आहे.

Girish Mahajan, Jaykumar Rawal, Bhausaheb Choudhary & Sanjay Raut
धक्कादायक... आमदारांनी बाजू घेतलेल्या संस्थेनेच हडप केला गरीब मुलांचा तांदूळ?

टिम शिवसेनेनं गेल्यावेळी झालेल्या चुका कोणत्याही परिस्थितीत पुन्हा करायच्या नाहीत, हे पक्क केलंय, हे सध्याच्या घडामोडीतून प्रकर्षानं दिसून येतं. शिवसेनेमध्ये दिग्गज नेत्यांची मोठी फळी आहे. त्यामुळे या नेत्यांमधील एकमत विजयश्रीकडे नेणारे ठरू शकते. ‘आपसांतील भांडणं बाजूला ठेवू, आधी सत्ता आणू’ हा नारा शिवसेनेमध्ये सध्या घुमतोय, ही त्यांची जमेची बाजू म्हणावी लागेल. दुसरीकडे महाविकास आघाडीचं काय होईल, किती जागांवर समझौता होईल, प्रमुख दावेदारी सांगणाऱ्यांना आघाडी म्हणा किंवा पक्ष कसे सामावून घेणार? हा मोठा प्रश्न पुढच्या काही दिवसांत निर्माण होईल, असे संकेत मिळत आहेत.

Girish Mahajan, Jaykumar Rawal, Bhausaheb Choudhary & Sanjay Raut
राष्ट्रवादीसाठी शिवसेना मदतीला आली: मलिक यांच्या समर्थनार्थ आक्रमक आंदोलन!

पक्षांतरामुळे भाजपच्या गोटात सध्या सामसूम आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते आणि संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची सूत्र आली, हे बरंच झालं. जयकुमार रावल यांच्या कामाच्या पद्धतीपेक्षा महाजन यांची कामाची पद्धत वेगळी आहे. रावल शांतपणे निर्णय घेतात, तर महाजन आक्रमक निर्णयांसाठी ओळखले जातात. निवडणूक काळात महाजनांचा हातखंडा मोठा आहे. नाशिक भाजपच्या एकूण निर्णय प्रक्रियेवर महाजन आणि रावल यांच्यामुळे खानदेशचा वरचष्मा दिसून येतो. या दोघा नेत्यांत चढाओढ कधीच नव्हती. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. महाजन यांच्याकडे प्रभारीपदाची सूत्रे आल्यानंतर भाजपच्या संघटनात्मक पातळीवर पुढच्या काही दिवसांत वेगाने आणि महत्त्वपूर्ण बदल झाल्यास आश्चर्य वाटायला नको. हे बदल आवश्यकदेखील आहेत. जोपर्यंत नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना बदल दिसणार नाहीत, तोपर्यंत कामाची ऊर्जा निर्माण होणं कठीण दिसतंय.

स्थायी समितीचे सभापती गणेश गिते, आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे यांचे पती महेश हिरे यांना अधिक मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. जबाबदाऱ्यांचे फेरनियोजन केल्यानंतर भाजपची आक्रमक व्यूहरचना असेल, हे सांगण्यासाठी तज्ज्ञाची आवश्यकता नाही. कुठल्याही पक्षाशी युतीचा वगैरे संबंध नसल्याने भाजपा जोरदार बॅटिंग करणार हे स्पष्ट आहे. विरोधकांपैकी कोणत्याही पक्षात उमेदवारीवरून ताणातणी झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक लाभ भाजपला मिळेल. आरक्षणानंतर चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल.

सिडको आणि नाशिक रोड हे तसे शिवसेनेचे बालेकिल्ले. सिडकोत सुधाकर बडगुजर यांना घेरणं हे भाजपचं सर्वांत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. नाशिक रोड परिसरात भाजपला गेल्यावेळी चांगलं यश मिळालं आहे. ते अधिक वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल, पण ज्येष्ठ नेते बबनराव घोलप आणि दत्ता गायकवाड यांच्यामुळे शिवसेना तिथे सध्या मजबूत दिसून येते. नाशिक मध्य हा पक्षाचा म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ नेते वसंत गिते यांचा बालेकिल्ला आहे. २०१२ मध्ये जेव्हा मनसेला नाशिककरांनी कौल दिला, तेव्हा गिते यांच्यामुळे मध्यची सर्वाधिक ताकद मनसेला मिळाली. २०१७ मध्ये ती ताकद भाजपला मिळाली. आता शिवसेनेसाठी सर्वाधिक संधी इथे आहे. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि वसंत गिते यांची केमेस्ट्री भाजपला धक्का देऊ शकते. अजय बोरस्ते संयमी आणि प्रसंगी आक्रमक नेते म्हणून इथे जम बसवून आहेत. त्यामुळे अनेक वर्षांनी शिवसेना मध्य भागात डोकं वर काढण्याची शक्यता आहे. आमदार देवयानी फरांदे विरुद्ध शिवसेना असा सामना इथ रंगेल. मात्र मुद्द्यांवर किंवा ध्रुवीकरणाच्या दिशेने निवडणूक गेल्यास चित्र वेगळं असू शकतं.

पंचवटीत ज्येष्ठ नेते सुनील बागूल यांना शिवसेनेने बळ दिल्याने भाजपची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे. या एकूण चित्रामध्ये आत्तापर्यंत पिता एका पक्षात, तर मुले अन्यत्र अशी स्थिती होती. ते मोठं पॅचपच घडवून आणल्याने भाजपची चिंता अधिक वाढली आहे. प्रथमेश गिते आणि मनीष बागूल शिवसेनेसाठी बूस्टर डोस ठरतील. सातपूरमध्ये दिनकर पाटील यांनी भाजपची मोट चांगली बांधून ठेवली आहे. तिथे शिवसेनेचा शिरकाव सध्या तरी कठीण दिसतोय. येत्या काळात कशा घडामोडी घडतात, त्यावर सातपूरचं चित्र अवलंबून असेल. विलास शिंदे भाजपला घेरण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जुने नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजप या दोघांसाठी कठीण परिस्थिती असेल.

भाजपसाठी पक्ष सोडणाऱ्यांना रोखणं हे सर्वांत मोठं आव्हान नजीकच्या काळात आहे. संकटमोचक गिरीश महाजन हे रोखण्यात किती यशस्वी ठरतात, हे महत्त्वाचं आहे. भाजपची म्हणून आपली काही वैशिष्ट्य आहेत. केडर बेस पक्ष ही भाजपची ओळख. व्यक्तीपेक्षा पक्षाला महत्त्व देणारे कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे उमेदवार कोण, हा भाजपसाठी फार महत्त्वाचा मुद्दा नसतो. मात्र उमेदवारांची निवड करताना निवडून येण्याची क्षमता हा प्रमुख निकष भाजपत कटाक्षाने पाळला जातो. ते त्यांच्या यशाचं गमकदेखील आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळेल, यापेक्षा कोणाला उमेदवारी नाकारली जाईल, हे भाजपत महत्त्वाचं ठरेल. या मुद्द्यांचा आउटगोइंगवरही परिणाम होईल.

भाजप यंदाच्या निवडणुकीत अधिक चिवटपणे उतरणार हे स्पष्ट आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून येणारे मोठे प्रकल्प ही भाजप आणि नाशिकसाठी सर्वाधिक जमेची बाजू आहे. हे मुद्दे आणि स्थानिक कार्यकर्त्यांची मोट भाजपने कधीच बांधून ठेवली आहे. शिवसेनेचे मनसुबे उधळून लावण्याची क्षमता भाजपत नक्कीच आहे. आपले बालेकिल्ले सांभाळत विरोधकांच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची रणनीती भाजपची असेल, आउटगोइंग रोखत इनकमिंगचा सिलसिला सुरू करण्यात गिरीश महाजन आणि भाजप तरबेज आहे. भाजप आणि शिवसेना हे सध्या चर्चेचे मुद्दे आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे यांच्या गोटात अजून तरी शांतता आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com