पुणे : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार (Post-poll Violence) उसळला होता. या राजकीय हिंसाचारात भाजपसह तृणमूलच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. तसेच घरं, दुकानं, सरकारी मालमत्तांची जाळमोळ, महिलांवर अत्याचार, मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. सीबीआय (CBI) कडून याचा तपास केला जात असून त्यात पुणे कनेक्शन समोर आलं आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल दोन मे रोजी जाहीर झाल्यानंतर बंगालमधील अनेक भागात हिंसाचार सुरू झाला. काही दिवस हा हिंसाचार सुरू होता. तृणमूल काँग्रेसने जाणीवपूर्वक हा हिंसाचार घडवत भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या, त्यांच्या कुटूंबियांचा छळ केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातो. तर तृणमूलकडूनही भाजपकडे बोट दाखवले जात आहे.
हिंसाचाराबाबत आलेल्या अनेक तक्रारींची दखल घेत कोलकता उच्च न्यायालयाने मागील महिन्यात या हिंसाचाराची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले. यामध्ये प्रामुख्याने बलात्कार व खूनाच्या आरोपांची चौकशी सीबीआयकडून केली जात आहे. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये सीबीआयकडून 35 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अनेकांना अटकही केली आहे.
यातीलच एका प्रकरणात सीबीआयकडून सोमवारी पुण्यात एकाला अटक करण्यात आली आहे. बंगालमधील हिंसाचाराच्या प्रकरणातील हा फरार आरोपी आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर चार दिवसांच्या ट्रान्झिट रिमांड देण्यात आला आहे. सीबीआयकडून या आरोपीला बंगालमध्ये नेले जाईल. हा आरोपी हिंसाचारानंतर पुण्यात पळून आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बंगालमध्ये 30 तारखेला तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. याच्या प्रचारासाठी भाजपचे उपाध्यक्ष दिलीप घोष हे सोमवारी दुपारी भवानीपूर मतदारसंघात दाखल झाले होते. पण त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी रोखलं. जमाव आक्रमक झाल्यानंतर सुरक्षारक्षकांना त्यांच्यावर पिस्तूल रोखावे लागले. या घटनेनंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीकेची झोड उठवली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.