
लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या ताफ्याने काल (ता.3) आठ जणांना चिरडले होते. यात चार शेतकरी (Farmers) आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहांनी मौन धारण केले आहे.
लखीमपूर खीरीतील घटनेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे. तरीही भाजपचे सर्वोच्च नेतृत्व यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. विधानसभा निवडणुका तोंडावर असलेल्या उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेमुळे भाजप नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे. याचा मोठा फटका आगामी निवडणुकीत पक्षाला बसण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप प्रवक्त्यांपासून बडे नेते यावर बोलण्यास तयार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
यातच जगातील सर्व घडामोडींवर ट्विट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात एवढा मोठा हिंसाचार होऊनही मोदींनी एकही ट्विट केलेले नाही. याचवेळी जपानच्या नवीन पंतप्रधानांचे स्वागत करणारे ट्विट मात्र, त्यांनी केले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडूनही या घटनेवर ट्विट करण्यात आलेले नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गृह मंत्रालयानेही याबाबत मौन धारण करीत ट्विट केलेले नाही.
लखीमपूर खिरीतील घटनेमुळे भाजप सरकार अडचणीत आले आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतले जात आहे. पोलिसांनी लखीमपूर खिरीमध्ये जमावबंदी लागू केली आहे. या घटनेची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. याचबरोबर या प्रकरणी न्यायिक चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. काल लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा अभिषेक आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 4 शेतकरी आणि 4 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.
मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा काल दुपारी तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.