

Beed Politics: मंत्री पकंजा मुंडे यांच्या गेवराईतील एका वक्तव्याची सध्या जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचे पालकमंत्री पद गेले. दिवंगत अजित पवारांनी जिल्ह्याची सुत्रं आपल्या हाती घेतली होती. बदनामीचा डाग पुसून बीड जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर आणत असतानाच अजित पवारांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. डोंगराएवढे दुःख डोक्यावर असताना सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या पश्चात जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले.
सुनेत्रा पवार यांना अद्याप जिल्ह्याला पुरेसा वेळ देता येत नसला तरी अजित पवारांनी बीड जिल्ह्याच्या विकासाचे बघितलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी वाटचाल सुरू केली आहे. बीडच्या क्रीडा संकुलासाठी 25 कोटींच्या निधीला मंत्रीमंडळाची मंजूरी हे त्याचे उदाहरण मानले जात आहे. एककीडे असे असताना काल गेवराई तालुक्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या भाजपा नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांनी 'बीड जिल्ह्याची खरी पालक मीच' असे विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
'बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर सुनेत्रा वहिनी असल्या तरी मी या जिल्ह्याची हक्काची पालक आहे. पालकमंत्री हे सरकारी पद असू शकतं, पण जिल्ह्याशी माझं नातं थेट रक्ताचं आणि काळजाचं आहे' , असं पंकजा मुंडे म्हणाल्या. गेवराई नगरपरिषदेच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनावेळी पंकजा यांनी विरोधकांसह मित्रपक्षांनाही थेट संदेश दिला.
जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून सुरू चर्चा सुरू असतानाच पंकजा मुंडेंनी आपल्या मनातील इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. सुनेत्राताईंसोबत माझी मुंबईत सविस्तर बैठक झाली आहे. जिल्ह्याच्या विकासाबाबत आम्ही एकत्र चर्चा केली असून आपण मिळून बीडचा कायापालट करू, असं मी त्यांना सांगितलंय. त्यामुळं पद कुणाकडंही असू द्या जिल्ह्याची संपर्कमंत्री म्हणून प्रत्येक फाईलवर आणि विकासकामावर माझीच नजर असणार आहे.
गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी गेवराईकरांनो, तुमच्या विकासाची चिंता आता सोडून द्या. आजपासून अधिकृतपणे मी गेवराईचे पालकत्व स्वीकारत आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी घोषणाही पंकजा मुंडे यांनी केली. माजी मंत्री बदामराव पंडित, नगराध्यक्षा गीता पवार, भाजप नेते बाळराजे पवार यांच्यासह कार्यकर्त्यांची यावेळी मोठी गर्दी होती.
राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराच्या चर्चा आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रीमंडळ वापसीचे संकेत दिले जात आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि त्यानंतरच्या महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे हे मंत्री होते.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांच्याकडेच होते. परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मीक कराड याचे मुख्य आरोपी म्हणून कनेक्शन समोर आल्यानंतर राजकीय दबावतून धनंजय मुंडे यांचे मंत्री आणि पालकमंत्री पद गेले होते. धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळात पुन्हा स्थान मिळाले तर त्यांच्याकडूनही पालकमंत्री पदावर दावा केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचे वरील वक्तव्य सूचक मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.