विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी अन् आमदाराला लागली थेट राज्यसभेची लॉटरी

आम आदमी पक्षाने पंजाबचे मैदान मारल्यानंतर आता राज्यसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे.
Raghav Chadha
Raghav ChadhaSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने (AAP) पंजाबचे मैदान मारल्यानंतर आता राज्यसभेच्या (Rajya Sabha) निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पंजाबमध्ये ११७ पैकी तब्बल ९२ जागा जिंकत काँग्रेसचा (Congress) अक्षरशः सुपडासाफ केला आहे. त्यामुळे राज्यसभेत संसदेत 'आप'ला पाच खासदारांचा बोनस मिळणार आहे. आपकडून सोमवारी राज्यसभेच्या पाच जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली.

क्रिकेटपटू हरभजनसिंग (Harbhajan Singh) याला 'आप'ने पंजाबमधून (Punjab) उमेदवारी घोषित केले आहे. मागील काही दिवसांपासून हरभजनसिंगच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यानुसार पाच नावांमध्ये त्याच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच आपने एक चकित करणारं नाव जाहीर केले आहे. दिल्लीतील आपचे आमदार व मुख्य प्रवक्ते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांनाही राज्यसभेत पाठवले जाणार आहे.

Raghav Chadha
नाराज आझाद देणार धक्का? एका वक्तव्यानं राजकारण ढवळलं

चढ्ढा हे पंजाबमधील आपचे सह प्रभारी होते. निवडणुकीदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांच्या मतदारसंघातच सुरू असलेला बेकायदेशीर वाळू उपसा तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्यावर त्यांनी रान उठवलं होतं. त्याचा फटका चन्नी यांना बसल्याचे निवडणुकीत दिसून आले. पंजाबमध्ये केलेल्या कामगिरीचे बक्षिस चढ्ढा यांना मिळाल्याचे बोलले जात आहे. ते ३३ वर्षांचे आहेत.

राज्यसभेच्या पाच नावांमध्ये आयआयटीचे प्राध्यापक संदीप पाठक यांचाही समावेश आहे. ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे निकटवर्ती मानले जातात. पाठक हे पंजाबमध्ये तीन वर्षांपासून काम करत होते. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी त्यांचेही मोठे योगदान असल्याची चर्चा आहे. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक कुमार मित्तल यांनाही राज्यसभेची लॉटरी लागली आहे. त्याचप्रमाणे कृष्णा प्रण ब्रेस्ट कॅन्सर केअर चॅरिटेबल टॅस्टचे संस्थापक संजीव अरोरा यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, देशात सध्या १३ जागांसाठी राज्यसभेची (Rajyasabha) निवडणूक जाहिर झाली आहे. राज्यसभेत २ ते ९ एप्रिल या काळात पंजाबमधून राज्यसभेवर असलेले सर्वाधिक ५, हिमाचल प्रदेशातून ४, आसाममधून २ आणि नागालॅंड व त्रिपूरामधून प्रत्येकी १ सदस्य निवृत्त होणार आहे. यासाठी ३१ मार्च रोजी मतदान होणार आहे. पंजाबमधील याच ५ जागांवर 'आप' आपले खासदार निवडून आणू शकतो. त्यामुळे राज्यसभेत 'आप'च्या खासदारांची संख्या ३ वरून थेट ८ वर जाण्याची चिन्ह आहेत.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com