Bharat Jodo Yatra News : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या आज (२४ जानेवारी) जम्मू येथे भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. भारत जोडो यात्रा ही द्वेषाच्या विरोधात असून प्रेम आणि सद्भावना पसरविण्याचे काम करत आहे. त्यामुळे मी या यात्रेत सहभागी होत आहे, अशी प्रतिक्रिया एका व्हिडिओद्वारे उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी दिली.
काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरमध्ये येऊन पोहोचली आहे. या यात्रेदरम्यान अनेक नेत्यांनी हजेरी लावून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आपला सहभाग नोंदवला आहे.
काय म्हणाल्या उर्मिला मातोंडकर
यावेळी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत त्या म्हणाल्या की,“कडकडीत थंडीत मी आज जम्मूत आले आहे. आज राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सामील होणार आहे. एक व्यक्ती, एक पक्ष आणि अनेक लोकांच्या सोबतीने ही यात्रा पुढे निघाली आहे. एक वेगळीच ऊर्जा या यात्रेत सहभागी झालेल्यांना मिळाली आहे. त्यातूनच ही यात्रा पुढे जात राहिली. या ऊर्जेचे नाव आहे ‘भारतीयता’. खूप सारं प्रेम, बंधुता, स्नेह, विश्वास आणि सद्भावना यामध्ये आहे.
हेच मूल्य आपल्या संपूर्ण देशाला जोडून ठेवते. त्याजोरावरच आपला देश इथपर्यंत आला आणि यापुढेही जाईल. मला वाटतं, जग प्रेम आणि सद्भावनेवर चालते. द्वेष आणि भीतीवर नाही. माझ्यासाठी या यात्रेचे महत्त्व राजकीय नसून सामाजिक आहे. सामाजिक मूल्यांवर चालणाऱ्या यात्रेत मी देखील सहभागी होत आहे. कारण भारतीयतेचे ज्योत आपल्या हृदयात तेवत आहे, ती तशीच राहावी.” अस त्या या व्हिडीओमध्ये म्हणाल्या.
भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यात असून लवकरच श्रीनगर येथे यात्रेची सांगता होणार आहे. या शेवटच्या टप्प्यात २० जानेवारी रोजी संजय राऊत आणि आज उर्मिला मातोंडकर सहभागी झाले आहेत. उर्मिला मातोंडकर यांचे सासर काश्मीरमध्ये आहे. आपल्या सासरी आल्यानंतर उर्मिला मातोंडकर कश्मीरी वेशभूषेत दिसल्या.
शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधून घेतले.
दरम्यान, आज त्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे त्या पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु, राजकीय हेतुने नव्हे तर सामाजिक हेतुने आपण भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचं मातोंडकर यांनी सकाळीच स्पष्ट केलं होतं.