कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस पूर्ण : पुढचे लक्ष्य संपूर्ण दक्षिण भारत

Narendra Modi | Amit Shah | BJP : भाजपचे ‘मिशन साऊथ’ कर्नाटकमध्ये अडकून पडले आहे...
Narendra Modi, Amit Shah, J.P. Nadda
Narendra Modi, Amit Shah, J.P. Naddasarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये होणार आहे. उद्यापासून सुरु होत असलेल्या या दोन दिवसीय कार्यकारिणीमध्ये आगामी अडीच वर्षांमधील विधानसभा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी याबाबत पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P. Nadda) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशभरातील भाजपच्या प्रमुख पक्षनेत्यांशी संवाद साधणार आहेत. (Narendra Modi | BJP | Latest News)

भाजपने हैदराबाद निवडले कारण पुढचे लक्ष्य संपूर्ण दक्षिण भारत :

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून गेल्यावर शिवसेना बंडखोरांसह सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपची सत्ता असलेल्या राज्ये-केंद्रशासित प्रदेशांची एकूण संख्या १७ वर पोचली आहे. सत्तेत नसतानाही सत्ता खेचून आणण्याचे लक्ष्य भाजप नेतृत्वाने साध्य केलेले महाराष्ट्र हे कर्नाटक व मध्य प्रदेश यानंतरचे तिसरे राज्य ठरले आहे.

यापूर्वी गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश व मणिपूरमध्ये भाजप स्वबळावर सत्तेत असून बिहार, नगालॅंड, मेघालय व पुदुचेरी या चार ठिकाणी मित्रपक्षांसह भाजपकडे सत्तेची सूत्रे आहेत.

मात्र दाक्षिणात्य राज्ये मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा अश्वमेध अडविण्यात गेली आठ वर्षे आघाडीवर आहेत. त्यामुळे भाजपने त्याकडे लक्ष वळविले असून तेलंगणाच्या मार्गाने दक्षिणायन मोहिमेवर भाजप उतरणार हे स्पष्ट आहे. तब्बल १८ वर्षांच्या खंडानंतर हैदराबादमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी होत आहे.

केरळ जिंकणे तूर्त अवघड असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपने तेलंगणा व आंध्र प्रदेशाकडे लक्ष वळविले आहे. कर्नाटकातील भाजपच्या विजयाला दक्षिण दिग्विजय म्हटले गेले पण, भाजपचे ‘मिशन साऊथ’ तेथेच अडकून पडले. शिवाय कर्नाटकात येडियुरप्पांच्या नेतृत्वाखालील भाजपचा विजय हा मोदीयुग सुरू होण्याआधीचा होता. आता तेलंगणात मुदतीआधी विधानसभा निवडणुका घेण्याचा डाव केसीआर पुन्हा खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच तेथे भाजपने सारा जोर लावला आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीपूर्वी राज्याच्या सर्व ११९ विधानसभा मतदारसंघांचा मुक्कामी दौरा करण्याचे निर्देश पक्षनेतृत्वाने भाजपचे तमाम खासदार, मंत्री व आमदारांना दिला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या घरातच त्यांना ललकारण्याचा भाजपचा हा पहिला मोठा प्रयत्न असेल. २०२० मध्ये ग्रेटर हैदराबाद महापालिका व हुजुराबाद व दुब्बाकामध्ये भाजपने उल्लेखनीय कामगिरी केली होती.

भाजपची आंध्र प्रदेशावरही नजर आहे. हैदराबादची बैठक संपताच पंतप्रधान मोदी चार जुलै रोजी भीमावरम येथे जाऊन स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या १२५ व्या जयंती कार्यक्रमांचे उद्‍घाटन करतील. यापूर्वी डाव्यांचे एकछत्र असलेल्या त्रिपुराचा गड सर करण्याची रणनीती यशस्वी करणारे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील देवधर यांना भाजपने जगनमोहन रेड्डी यांच्या आंध्रात उतरविले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com