AIADMK News : भाजपला दक्षिणेत दुसरा मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकमध्ये झालेल्या पराभवानंतर आता तमिळनाडूतील मोठा पक्ष असलेल्या ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कडगमने भाजपचा पाठिंबा काढला आहे. 'एनडीए'ची साथ सोडत असल्याचे त्यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर (BJP) आधीच 'इंडिया' आघाडीचे मोठे आव्हान आहे. 'इंडिया' आघाडीच्या बैठका सुरू असून एनडीएनेही चांगलीच कंबर कसली आहे. मात्र, निवडणुकीच्या आधीच तमिळनाडूतील मोठ्या पक्षाने भाजपचा पाठिंबा काढला आहे. तमिळनाडूमध्ये भाजप एआयएडीएमके च्या माध्यमातून पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता.
तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) भाजप आणि एआयएडीएमकेचा वाद विकोपाला गेला होता. भाजप नेत्यांकडून सातत्याने एआयएडीएमकेच्या नेत्यांवर टीका केली जात होती, असा दावा एआयएडीएमकेने केला आहे. त्यामुळेच एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. पक्षाची बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
पक्षाचे उपमहासचिव केपी मुनुसामी यांनी सांगितले की, आम्ही भाजपसोबत युती न करण्याचा आणि एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. पक्षाच्या जिल्हा सचिव, खासदार आणि आमदारांच्या बैठकीत एनडीएतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. एआयएडीएमके आपल्या मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवणार आहे. एआयएडीएमकेने आरोप केला आहे की, राज्याचे भाजप नेतृत्व एआयएडीएमके नेत्यांची जाणीवपूर्वक बदनामी करत होते, म्हणून आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला आहे.
तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई यांनी द्रविडियन आयकॉन सीएन अन्नादुराई यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच, जे जयललिता यांच्यावरही टीका केली होती त्यामुळे तामिळनाडूमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. या वादानंतरच एनडीएतून पक्ष बाहेर पडला असल्याची चर्चा आहे.
Edited by : Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.