चेन्नई : तमिळनाडूच्या (Tamil Nadu) माजी मुख्यमंत्री जयललिला (Jayalalithaa) यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला (V.K.Sasikala) यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे. शशिकलांचे आता जोरदार कमबॅक होण्याचे संकेत मिळत आहेत. अण्णाद्रमुकचे (AIADMK) समन्वयक व माजी मुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनीच याबाबत ठराव केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शशिकला आणि त्यांचे भाचे टी.टी.व्ही. दिनकरन यांना पुन्हा अण्णाद्रमुकमध्ये घ्यावे, असा ठराव अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी मांडला आहे. पक्षाच्या थेनी येथे झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. खुद्द पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला. राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत अण्णाद्रमुकला पराभवाचा धक्का बसला आहे. अण्णाद्रमुकचे दोन गट असून, पनीरसेल्वम गट आता शशिकलांच्या मागे उभा राहिला आहे. माजी मुख्यमंत्री एडापाडी पलानीस्वामी यांचा गट आता यावर काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागले आहे. यामुळे शशिकला लवकरच पक्षात परतून सूत्रे हाती घेतील, असे संकेत आहेत.
जयललितांना पक्ष कार्यकर्ते अम्मा तर शशिकलांनी चिन्नम्मा असे संबोधत. जयललितांच्या मागे शशिकला या कायम सावलीसारख्या असत. जयललितांच्या निधनानंतर शशिकलांनी पक्षासह सरकार ताब्यात घेतले होते. परंतु, त्यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शिक्षा भोगण्यासाठी तुरूंगात जावे लागल्यानंतर त्यांच्या हातातून पक्ष आणि सरकार निसटले होते. शशिकला यांनी गेल्या वर्षी 3 मार्चला राजकारणातून निवृत्ती घेतली होती. आता त्या पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.
पक्षाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त शशिकलांनी गेल्या वर्षी 17 ऑक्टोबरला पक्षाचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रन यांच्या स्मारकाच्या ठिकाणी पक्षाचा ध्वज फडकावला होता. तेथे एका कोनशिलेचे अनावरणही शशिकलांनी केले होते. त्यावर त्यांचा उल्लेख पक्षाच्या सरचिटणीस असा करण्यात आला होता. विशेष म्हणजे अण्णाद्रमुक पक्षाचा सुवर्णमहोत्सव साजरा होण्याच्या एक दिवस आधी गेल्या वर्षी 16 ऑक्टोबरलला अण्णाद्रमुकचा ध्वज लावलेल्या मोटारीतून शशिकला या मरिना बीचवर पोचल्या होत्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. त्यांना जयललितांसोबत माजी मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रमन आणि अण्णादुराई यांच्या स्मारकालाही भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात अण्णाद्रमुकचे कार्यकर्ते उपस्थित होते. यातून त्यांनी माजी मुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन्ही गटांना इशारा दिल्याचे मानले जात होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.