माजी मुख्यमंत्री म्हणाले, अजून दहा दिवसच काँग्रेसमध्ये राहणार!

मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Congress
Congress File Photo

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) पदावरून हटवल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेस (Congress) विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा आज केली. असे असले तरी काँग्रेसमधून ते अजूनही बाहेर पडलेले नाहीत. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले असून, यावर त्यांनी अखेर खुलासा केला आहे.

कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आज नव्या पक्षाची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिला नसल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. मी प्रदीर्घ काळ काँग्रेससोबत आहे. आणखी दहा दिवस राहिलो तर काय फरक पडतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यांनी काँग्रेसचा अद्याप राजीनामा न दिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ही कॅप्टनची नवी खेळी तर नाही ना, अशीही शंका व्यक्त होत आहे.

कॅप्टन यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील विकासकामांचा आढावाही आज घेतला. राज्यातील 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांपैकी 92 टक्के आश्वासने पूर्ण केली आहेत, असा दावाही त्यांनी केला. अनेक मंत्र्यांनी आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप अमरिंदरसिंग यांच्यावर केला होता. याचाही समाचार त्यांनी घेतला. मी कोणत्याही मंत्र्याचे नाव घेणार नाही पण मी 18 कलमी कार्यक्रम यशस्वीपणे राबवला आहे, असे त्यांनी सांगितले.

कॅप्टन अमरिंदरसिंग म्हणाले की, आमच्यासोबत अनेक काँग्रेस नेते आहेत. पक्षाची स्थापना झाल्यानंतर या नेत्यांची नावे आम्ही जाहीर करू. पंजाबमधील सर्वच्या सर्व 117 जागा आमचा पक्ष लढवेल. आम्ही स्वबळावर लढणार की आघाडी करणार याचे उत्तर तुम्हाला आगामी काळात मिळेल. पक्षाच्या नावाची घोषणा लवकरच होईल. कारण आमचे वकील निवडणूक आयोगासोबत या संदर्भात चर्चा करीत आहेत.

Congress
पंजाबमध्ये राजकीय भूकंप; काँग्रेसच्या कॅप्टनची आता नवीन टीम

भाजपसोबत आघाडी करण्याच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, आमचा पक्ष जागावाटपाच्या संदर्भात प्रस्ताव आल्यास विचार करेल. परंतु, आम्ही भाजपसोबत जाणार आहोत, असे आम्ही कधीच म्हटले नव्हते. मी फक्त म्हटले होते की मी आणि माझा पक्ष जागावाटपाबाबत चर्चा करीत आहोत. अद्याप आघाडी करण्याविषयी कोणतीही चर्चा राजकीय पक्षांशी झालेली नाही.

Congress
महाराष्ट्रात वाँटेड असलेल्या गोसावीचा उत्तर प्रदेश पोलिसांनाही गुंगारा! नेमक काय घडलं...

कॅप्टन यांच्या पक्षस्थापनेच्या हालचालींना पंजाबचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी अकाली दलाचे विविध गटांना सोबत घेण्यासाठी पावले उचलली आहेत. असे असले तरी सर्वच राजकीय पक्ष याबाबत सावध प्रतिक्रिया देत आहेत. पुढील वर्षाच्या सुरवातीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यामुळे आतापासूनच सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कॅप्टन यांच्याकडे भाजपनेही मैत्रीचा हात पुढे केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com