'टॅक्स फ्री' न करताही 'काश्मीर फाईल्स' सगळ्यांना फुकट दाखवण्याचा केजरीवालांनी सुचवला फंडा

पंतप्रधान मोदींसह भाजपचे नेते 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटासाठी मैदानात उतरले आहेत.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

नवी दिल्ली : 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) चित्रपटावरुन सध्या मोठा प्रमाणात गदारोळ सुरू आहे. पंतप्रधान मोदींसह भाजप नेते या चित्रपटासाठी मैदानात उतरले आहेत. अनेक राज्यांत हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी होत आहे. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी चित्रपट टॅक्स फ्री न करताही सगळ्यांना फुकट पाहता येईल, असा फंडा सांगितला आहे. याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

हा चित्रपट उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, चंडीगड आणि हिमाचल प्रदेशमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. दिल्लीच्या विधानसभा अधिवेशनात भाजपच्या आमदारांनी काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त करण्याची मागणी लावून धरली होती. यावर उत्तर देताना केजरीवालांना हा फंडा सांगितला. ते म्हणाले की, हा चित्रपट सगळ्यांनी पाहावा, अशी भाजपची इच्छा आहे. अशीच इच्छा चित्रपटाचा निर्माता विवेक अग्निहोत्री याचीही आहे. त्यामुळे हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करण्याऐवजी हा चित्रपट त्यांनी सरळ यूट्यूबवर प्रदर्शित करावा. यामुळे तो सगळ्यांनाच फुकट पाहता येईल.

केजरीवाल यांनी मोदींवर या निमित्ताने निशाणा साधला. ते म्हणाले की, देशातील सगळे भाजपवाले या चित्रपटाचे गल्लीबोळात पोस्टर लावत फिरत आहेत. यासाठीच तुम्ही राजकारणात आला होता का? तुमच्या मुलांना तुम्ही काय उत्तर द्याल? केंद्रात 8 वर्षे सरकार चालवल्यानंतर देशाचा पंतप्रधानाला विवेक अग्निहोत्रीच्या पायात शरण घ्यावी लागत आहे. याचाच अर्थ त्या पंतप्रधानांनी आठ वर्षे काहीही काम केलेले नाही.

Arvind Kejriwal
निवडणुका संपताच दणका! वाहनचालकांनंतर आता गृहिणींना दरवाढीचे चटके

निर्मात्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप

दरम्यान, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीनतराम मांझी (Jitan Ram Manjhi) यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाबद्दल अनेक गंभीर आरोप केले होते. हा चित्रपट दहशतवाद्यांचा कट असून, याच्या निर्मात्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असू शकतात, असे त्यांनी म्हटले होते. बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप आघाडीचे सरकार आहे. या सरकारमध्ये मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HAM) हा पक्षही सहभागी आहे. त्यांनी भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या काश्मीर फाईल्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे बिहार सरकारमधील बिघाडी समोर आली.

Arvind Kejriwal
ममतांचा दणका! तृणमूलच्या नेत्यालाच अटक करण्याचे पोलिसांना आदेश

मोदींकडून चित्रपट अन् दिग्दर्शकाचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) संपूर्ण मंत्रिमंडळ आणि भाजपचे (BJP) नेते या चित्रपटाचा प्रचार करताना दिसत आहे. काश्मिरी पंडितांवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटाचे आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे जाहीर कौतुक केले होते. काश्मीर पंडितांवरील अत्याचार दाखवणारा हा चित्रपट पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावतात, असे मोदी म्हणाले होते. याचबरोबर मोदींनी अग्निहोत्री हे निडर असल्याची प्रशंसाही केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com