नवी दिल्ली : पंजाबमधील मुख्यमंत्री बदलानंतर उठलेले वादळ अद्याप शांत झालेले नाही. तर आता दुसरीकडे छत्तीसगडमधील मुख्यमंत्री बदलाचे वारेही जोरात वाहू लागले आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना पुढील काही दिवसांत राजीनामा देण्यास सांगितल्याचे समजते. त्यामुळे दिवाळीआधी किंवा दिवाळीनंतर लगेचच छत्तीसगडला नवीन मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.
काँग्रेसची (Congress) सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्येही (Chhattisgarh) मुख्यमंत्रिपदावरून (Chief Minister) संघर्ष पेटलेला आहे. विद्यमान सरकारमधील आरोग्यमंत्री असलेले टी. एस. सिंहदेव (T.S.Singh Deo) यांनी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी सांगितली आहे. सिंहदेव आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी यापूर्वीच दिल्लीवारी केली आहे. दोघांमधील वाद मिटल्याचा दावा पक्षाकडून केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात अजूनही धुसफूस सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
अजूनही बघेल यांना बदलण्याची चर्चा सुरूच आहे. यापार्श्वभूमीवर बघेल समर्थक डझनभर आमदार नुकतेच दिल्लीत दाखल झाले होते. पक्षश्रेष्ठींना भेटून बघेल यांना न बदलण्याची मागणी या आमदारांनी केल्याचे समजते. तसेच त्याआधीही छत्तीसगडच्या सर्व आमदारांनी दिल्लीत बोलावण्यात आले होते. वरिष्ठ नेत्यांनी सर्व आमदारांची मुख्यमंत्री बदलावर चर्चाही केली आहे.
त्यानंतर आता सोनिया यांनी बघेल यांना नोव्हेंबर आधीच पद सोडण्यास सांगितल्याचे समजते. बघेल यांच्याकडूनही पद वाचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. काँग्रेसच्या कार्यकारी समितीची नुकतीच बैठक झाली आहे. त्यानंतर दोन दिवसांतच ही बातमी समोर आली आहे. या बैठकीमध्ये देशातील सध्याची राजकीय स्थिती, आगामी निवडणुका व संघटनात्मक निवडणुकांवर चर्चा झाली आहे. त्यामुळे बघेल यांना पुढील काही दिवसांत पद सोडावे लागणार असल्याचे समजते.
दरम्यान, राज्यातील बघेल सरकारने अडीच वर्षांचा कालावधी जून महिन्यात पूर्ण केला. यानंतर सिंहदेव आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्रिपदासाठी दबाव आणण्यास सुरवात केली. राज्यात काँग्रेसची सत्ता डिसेंबर 2018 मध्ये आल्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्यात आला होता, असा दावा ते करीत आहेत. यावर बघेल यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. अडीच वर्षांसाठी पदाचे वाटप आघाडी सरकारमध्ये असते. छत्तीसगडमध्ये मात्र काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळाले असल्याचा युक्तिवाद बघेल यांनी केला आहे. सोबतच मुख्यमंत्रिपदाबाबत पक्ष नेतृत्वाचा निर्णय अंतिम असेल, असे सांगून त्यांच्याकडून या वादाचा चेंडू पक्ष नेतृत्वाच्या दरबारी टोलावला जातो.
विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बनविताना सुरवातीचे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद बघेल यांच्याकडे तर उर्वरित कालावधीसाठी सिंहदेव यांना देण्याचा फॉर्म्युला ठरला होता, असे सिंहदेव समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र, बघेल यांनी असा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचा पवित्रा घेतल्याने सिंहदेव यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडून नाराजी दाखविणे सुरू केले होती. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिल्लीत धाव घेऊन पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.