लखनौ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा (UP Election 2022) पारा आता चांगलाच चढला आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे निश्चित करण्याची धडपड सुरू असून अनेक नाराज नेते पक्षांतर करू लागले आहेत. तर अनेक नेत्यांचे तळ्यातमळ्यात आहे. यातूनच एका इच्छुकाला मोठा भ्रमनिरास झाल्याने तो पोलीस ठाण्यातच ढसाढसा रडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उमेदवारीसाठी पैसे देऊनही तिकीट न मिळाल्याने या नेत्याने आत्मदहनाचाही इशारा दिला आहे.
बहुजन समाज पक्षाचे (BSP) नेते अर्शद राणा (Arshad Rana) यांना तिकीट न मिळाल्याने रडू आवरलं नाही. मुजफ्फरनगरमधील चरथावल मतदारसंघातून त्यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू होते. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती. त्यांनी प्रचार सुरू करत फलकही लावले होते. पण ऐनवेळी त्यांचं तिकीट कापण्यात आलं. हे समजताच त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. तिथं जात त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
अर्शद राणा यांनी आरोप केले आहेत की, पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दोन वर्षांपूर्वी माझ्याकडून विधानसभेच्या तिकीटासाठी 67 लाख रुपये घेतले आहेत. पण आपल्यासा विश्वासात न घेता उमेदवारी नाकारण्यात आली. तसेच पैसेही परत केले नाहीत. मला न्याय मिळाला नाही तर बसपा अध्यक्ष मायावती यांच्या घरासमोर आत्मदहन करू, असा इशाराही राणा यांनी दिला आहे. हे सांगताना राणा यांना पोलीस अधिकाऱ्यांसमोरच रडू कोसळलं.
राणा म्हणाले, पक्षाच्या नेत्यांनी माझा तमाशा केला. मला विश्वासात घेऊन इतराला तिकीट दिले असते तर एवढा त्रास झाला नसता. शमशुद्दीन राईन यांनी दोनदा मायावती यांची भेट घडवली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मागतली तेव्हा पुन्हा 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. आधी दिलेले पैसे परत दिले नाहीत, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा राणा यांनी दिला आहे.
बसपाचे जिल्हाध्यक्ष सतिश रवी यांनी राणा हे पक्षात आहेत की नाहीत, हे माहिती नाही असं सांगितले. राणा यांचे प्रकरण नेमके काय आहे, हे मला माहित नाही. त्यांच्यावर पक्षाची कोणतीही जबाबदारी नाही. त्यामुळे त्यांच्याबाबतीत काय घडले, याची माहिती नसल्याचे रवी यांनी स्पष्ट केलं. तर पोलीस निरीक्षक आनंद देव मिश्रा यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.