पंजाबमधील काँग्रेसचे राज्य खालसा! मुख्यमंत्री चन्नींचा राजीनामा

Punjab assembly election | Aam Aadami Party | Congress | Charanjitsingh Channi : भगवंत मान यांचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता
Charanjit Singh Channi
Charanjit Singh ChanniSarkarnama

चंदिगड : काल उत्तर प्रदेशसह गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब विधानसभेचे निकाल लागले. या निकालांमध्ये पंजाब वगळता ४ राज्यांत भाजपचा डंका वाजला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मैदान मारले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि 'आप'चे पंजाबमधील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या नेतृत्वात ११७ पैकी तब्बल ९२ जागा जिंकत काँग्रेसचा अक्षरशः सुपडासाफ केला आहे. सत्ताधारी काँग्रेसला केवळ १८ जागांवर तर भाजपला २ आणि अकाली दलाला ४ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

या निकालानंतर आता आम आदमी पक्ष पंजाबमध्ये स्वबळावर सरकार स्थापन करणार आहे. आज चंदिगडमध्ये आम आदमी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत भगवंत मान यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर उद्या किंवा परवा मान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री पदाचा शपथविधी कार्यक्रम विधानभवनात न घेता शहीद भगतसिंग यांच्या जन्मगावी होणार असल्याचे मान यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

या दरम्यान तिकडे काँग्रेसमध्ये देखील हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी आज दुपारी १ वाजता राजभवनावर जात राज्यपाल बनवारिलाल पुरोहित यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे आता अधिकृतरित्या आज पंजाबमधील काँग्रेसचे राज्य खालसा झाले असून आम आदमी पक्षाचा काळ सुरु झाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री आणि नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईपर्यंत चन्नी यांना काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्दू यांनी पराभव मान्य केला असून त्यांनी 'आप'चे अभिनंदन केले आहे. याशिवाय पराभवाची जबाबदारी स्विकारत आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यावर काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आभार मानत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तर, पराभवातून आपल्याला शिकायला मिळेल. तसेच जनतेची सेवा करत राहू, असे मत व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com