नवी दिल्ली : मागील काही दिवसांत काँग्रेसला (Congress) अनेक धक्के बसले आहेत. आता आणखी एक नवे संकट उभे ठाकल्याचे चित्र आहे. गांधी कुटुंबीयांशी अत्यंत जवळीक असलेले ज्येष्ठ नेते व उत्तराखंडचे (Uttarakhand) माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) यांनी केलेल्या ट्विटमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. पक्ष सोडण्याचे थेट संकेत त्यांनी यामध्ये दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होणार आहे. त्यासाठी रावत यांनी जोरदार तयारीही सुरू केली होती. पक्षांच्या बैठकांसह भाजपच्या (BJP) आमदारांना पक्षात घेण्याची रणनीतीही त्यांनी बनविली होती. पण शनिवारी अचानक पक्षावर ट्विटर बॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली. त्यांनी मनात खूप चलबिचल सुरू असल्याचे सांगत नव्या वर्षात कदाचित रस्ता सापडेल, असं म्हटल्याने ते काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रावत यांनी दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या 'न दैन्यं न पलायनम्' या कविताचा आधार घेतला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पुन्हा एकदा मनाच्या एका कोपऱ्यातून आवाज येत आहे, 'न दैन्यं न पलायनम्' (कोणतीही दया नको, आव्हानांना घाबरून पळायचे नाही, त्याचा सामना करायचा). खूप चलबिचल सुरू आहे, कदाचित नवे वर्ष रस्ता दाखवेल. भगवान केदारनाथ मला या स्थितीत मार्गदर्शन करतील, याचा मला विश्वास आहे.
निवडणूकरुपी समुद्रात पोहायचे आहे. पण संघटना ठिकठिकाणी सहकार्याचा हात पुढे करण्याऐवजी तोंड फिरवून उभी राहत आहे किंवा नकारात्मक भूमिका पार पाडत आहे. ज्या समुद्रात पोहायचे आहे, त्यात सत्तेने अनेक मगरी सोडल्या आहेत. ज्यांच्या आदेशानुसार पोहायचे आहे, त्यांचे हस्तक माझे हात-पाय बांधत आहेत. मनात अनेक विचार येत आहेत की, हरीश रावत आता बास, खुप पोहलो, आता विश्रांतीची वेळ आली आहे, असं रावत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
रावत यांच्या या ट्विटबॉम्बमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. रावत हे पक्षातील ज्येष्ठ नेते असल्याने त्यांनी उघडपणे व्यक्त केलेली नाराजी पक्षातील अंतर्गत कलह समोर आणणारी ठरली आहे. उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. त्यासाठी रावत यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. पण तेच नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्याने काँग्रेससमोर आणखी एका राज्यात संकट उभे ठाकले आहेत. रावत हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या वाटेवर जाणार की वेगळा निर्णय घेणार याबाबत राजकीय वर्तुलात चर्चांना उधाण आलं आहे.
रावत हे पंजाबचे प्रभारी असतानाच अमरिंदरसिंग व नवज्योत सिंग सिध्दू यांच्यातील वाद उफाळून आला होता. त्याचवेळी त्यांनी या पदावरून मुक्त करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. उत्तराखंडमधील निवडणुकांचे कारण त्यांनी त्यासाठी दिले होते. पण राज्यातील स्थानिक नेत्यांकडून त्यांना डावलले जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांची नाराजी काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.