अमृतसर : पंजाबमध्ये (Punjab) ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) रविवारी पहिल्यांदाच पंजाबमध्ये आले. त्यांनी भावी मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यासह अमृतसरमध्ये जोरदार मेगा रोड शोमध्ये सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्यांनी आपच्या आमदारांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यामुळे शपथविधीआधीच केजरीवाल यांनी आमदारांना दिलेला इशारा चर्चेत आला आहे.
भगवंत मान हे येत्या 16 मार्च रोजी शपथ घेणार आहेत. त्याआधी त्यांनी केजरीवाल यांच्यासह अमृतसरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले, माझा लहान भाऊ भगवंत कट्टर इनामदार आहे. पंजाबला इनामदार मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यामुळे सरकारही इनामदार असेल. पण कुणी मंत्री किंवा आमदाराने काही घोळ घातला तर त्यांना सोडणार नाही. थेट तुरुंगात जावे लागेल. पंजाबला काही लोक लुटत होते. आता ही लूट थांबेल. आता एक-एक पैसा गरिबांवर खर्च होईल, असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.
प्रचारादरम्यान जेवढी आश्वासनं दिली होती तेवढी पूर्ण केली जातील, असं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. काही गोष्टींना वेळ लागेल, तर काही गोष्टी लगेचच पूर्ण होतील. 16 मार्च रोजी भगवंत मान मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण त्यादिवशी भगवंत मान मुख्यमंत्री होणार नाहीत, तर पंजाबमधील एक-एक मुलगा मुख्यमंत्री बनणार आहे, असंही केजरीवाल यांनी सांगितले. त्यांनी शपथविधीसाठी प्रत्येक घरातील एका व्यक्तीला आमंत्रित केलं.
राज्यातील 122 जणांची सुरक्षा काढली
राज्यातील व्हीआयपी कल्चर संपवण्यासाठी पहिलं पाऊल टाकत मान यांनी 122 माजी खासदार-आमदार व इतर व्हीआयपी लोकांची सुरक्षा काढण्याच्या आदेशावर त्यांनी सही केली आहे. मान यांनी शनिवारी याबाबतचे आदेश काढले. सुरक्षा काढण्यात आलेल्या नेत्यांमध्ये प्रामुख्याने काँग्रेस (Congress) व अकाली दलाच्या नेत्यांचा समावेश आहे. पण यामधून माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्यासह बादल कुटुंबियांना वगळण्यात आलं आहे. त्यांना केंद्र सरकारच्या सुचनेनुसार सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आल्यानं हा निर्णय घेण्यात आले आहे. मान यांनी नेत्यांच्या सुरक्षेवर होणाऱ्या खर्चावर बोट ठेवलं होतं.
मान म्हणाले होते की, एककीडे पोलीस ठाण्यांमध्ये जागा रिक्त आहेत. तर दुसरीकडे नेत्यांना सुरक्षा दिली जात असून त्यासाठी त्यांच्या घराबाहेर टेंट टाकले आहेत. आम्ही पोलिसांवरील ताण कमी करू. साडे तीन कोटी लोकांची सुरक्षा महत्वाची आहे. दरम्यान, चरणजितसिंग चन्नी यांनीही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपली सुरक्षा कमी करण्याचा निर्णय़ घेतला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.