
दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. येत्या 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे दिल्ली काबीज करण्यासाठी राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. निवडणूक प्रचाराला वेग आला असून आजपासून आम आदमी पार्टी आणि भाजप या दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. दिल्लीची निवडणूक कशी जिंकायची यासाठी सर्व पक्षांनी रणनीती आखली आहे.
विजयाच्या हॅट्रिकसाठी आम आदमी पक्षाने जय्यत तयारी केली आहे. तर भाजप आपला 27 वर्षांचा वनवास संपवण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरला आहे. त्याचवेळी, काँग्रेसही आपला वनवास संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे (BJP) फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ निवडणुकीच्या रिंगणात प्रचारासाठी उतरले आहेत.
दिल्लीत आज 'रॅली डे' असणार आहे, कारण भाजपचे फायरब्रँड नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आज तेथे रोड शो करणार आहेत. योगींचा 'बटेंगे तो कटेंगे’ हा नारा हरियाणा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत तोच राजकीय प्रयोग करण्यात आला. योगी आदित्यनाथ यांच्यासह ‘बटेंगे तो कटेंगे’ हा संदेश देणारे फलक झळकले होते. त्यामुळे पुन्हा एकदा योगींचा हा नारा दिल्लीत भाजपला तारणार का? याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.
योगी आदित्यनाथ दिल्लीत 14 जाहीर सभा घेणार आहेत. यामध्ये, जिथे मुस्लिम लोकसंख्या जास्त आहेत अशा ही जागांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ 23 जानेवारी रोजी तीन जाहीर सभा घेतील. तसेच 28 जानेवारी आणि 30 जानेवारी रोजी प्रत्येकी चार सभा घेणार आहेत. त्याशिवाय ते 1 फेब्रुवारीला तीन सभांमधून विरोधकांवर तोफ डागतील.
काँग्रेस, भाजपा आणि आम आदमी पक्षानं दिल्ली निवडणुकीसाठी आपापली रणनीती तयार केली आहे. आम आदमी पक्षातील केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि त्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसनं विचारपूर्वक रणनीती आखली आहे. काँग्रेसनं दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना नवी दिल्लीच्या जागेवर केजरीवाल यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बेरवा, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार राधा मोहन सिंह यांची जाहीर सभा येथे होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.