Uttar Pradesh News : दिल्ली राज्याला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात प्रशासनाने केलेल्या एका तपासणीमध्ये जात प्रमाणपत्रांच्या फसवणुकीचे एक विचित्र आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीला पाच अपत्ये आहेत. यापैकी तिघांकडे अनुसूचित जाती (SC) आणि दोघांकडे अति मागासवर्गीय प्रमाणपत्रे आहेत. (Latest Marathi News)
पाचपैकी एका अपत्याने प्रभाग-26 मधून भाजपच्या तिकीटावर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र घेऊन नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. मात्र, आता त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. विजयनगरचा प्रभाग-26 सुंदरपुरी हा अनुसूचित जातीसाठी राखीव होता. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. राजकुमार नाव असलेल्या या नगरसेवकाने निवडणुकीत त्यांची जात 'कोरी' समाजाचे असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले आहे.
जिल्हा दंडाधिकारी राकेश कुमार सिंह यांनी या प्रकरणाची एसडीएमकडून चौकशी केली. अहवालानुसार, राजकुमारने कोरी जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. कोरी जात उत्तर प्रदेश राज्यात अनुसूचित जातीच्या प्रवर्गात येते. या संदर्भात गाझियाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ज्युनिअर हायस्कूलमधून दाखला देण्यात आला होता. याशिवाय कोरी जातीचे असल्याचे घोषणापत्रही त्यांच्याकडून अर्जासोबत देण्यात आली होती. त्यांचे भाऊ वेद प्रकाश आणि हरबंश लाल यांनी त्यांची जात मल्ला म्हणून दाखवली, ही जात उत्तर प्रदेशातील मागासलेल्या प्रवर्गात येते.
दुसरा भाऊ मदनलाल यांच्या जात प्रमाणपत्रात कोरी नोंद आहे. अंबाला कँट येथील त्यांची बहीण सीमा यांचे प्रमाणपत्र कोरी जातीचे आहे. तपास पथकाने या सर्व भावांकडून त्यांच्या मूळ वडिलोपार्जित जागेची माहिती घेतली. त्यानुसार एक भाऊ वेदप्रकाश यांनी त्यांचे मूळ बाराबंकी जिल्ह्यातील मल्लपुरवा या गावाचे असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात कुटुंबातील सदस्य जातीने कोरी आणि मल्ला असल्याचा दावा करत आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसडीएमने राजकुमार यांचे कोरी जात प्रमाणपत्र रद्द केल्याची माहिती तहसीलमधून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली आहे.
न्यायालयात खटला सुरू आहे -
हे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. याशिवाय अन्य 25 प्रभागांची प्रकरणेही न्यायालयात आहेत. बहुतांश नगरसेवकांवर चुकीची माहिती देऊन निवडणूक जिंकल्याचा आरोप आहे. प्रभाग 26 मधील तपास अहवाल न्यायालयात पाठविला जाणार आहे. यानंतर निर्णय घेतला जाईल. या प्रकरणी एसडीएम विनय कुमार सिंह सांगतात की, "डीएमच्या आदेशानुसार प्रमाणपत्राची तपासणी करण्यात आली. चुकीची कागदपत्रे देऊन मिळवलेले प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. त्याचवेळी गाझियाबादचे सहायक निवडणूक अधिकारी विशाल सिंह म्हणतात की, "निवडणूक जिंकल्यानंतर उमेदवाराचे जात प्रमाणपत्र चुकीचे असेल तरच न्यायालय त्यावर निर्णय घेऊ शकते."
(Edited BY - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.