माजी मुख्यमंत्री आणि माजी विरोधी पक्ष नेत्याची आमदारकी धोक्यात; अध्यक्षांकडे याचिका

Goa | Congress | Digambar Kamat : आठवा आमदार न मिळाल्याने काँग्रेसमधील 'एकनाथ शिंदे' यांचे बंड थंडावले...
Digambar Kamat | Michael lobo
Digambar Kamat | Michael loboSarkarnama

पणजी : गोवा काँग्रेसमधील (Congress) बंड फसल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि माजी विरोधी पक्ष नेते मायकल लोबो (Michael lobo) यांची आमदारकी धोक्यात आली आहे. काँग्रेसने कामत आणि लोबो यांच्याविरोधात करण्याची घोषणा केली असून गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत लोबो आणि कामत यांच्या आमदार अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे.

या याचिकेवर बोलताना गोवा विधानसभा अध्यक्ष रमेश तवडकर यांनी तात्काळ निर्णय होणार नसल्याचे कळविले आहे. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरु असल्याने आपण व्यस्त असल्याचे सांगून या याचिकेवर अधिवेशनानंतर निर्णय घेतला जाणार त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत तरी कामत आणि लोबो यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार फोडून काँग्रेसचा विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप कामत आणि लोबो यांच्यावर करण्यात आला आहे.

काय घडले होते गोव्यात?

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात ज्याप्रमाणे शिवसेनेतील (Shivsena) तब्बल दोन तृतीयांश आमदारांनी वेगळी भूमिका घेतली, त्याचप्रमाणेच गोवा काँग्रेसमध्येही दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्या नेतृत्वात तब्बल ८ आमदार फुटणार असल्याच्या चर्चा काँग्रेसमध्ये सुरु झाल्या होत्या. मात्र दोन तृतीयांश आमदारांचा कोटा पूर्ण करण्यासाठी आठवा आमदार न मिळाल्याने काँग्रेसमधील हे बंड तुर्तास गुंडाळले असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसच्या या बंडात सुरवातीला दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई व कार्लोस फेरेरा हे सहा आमदार होते. अशातच एका खनिज उद्योजकाच्या मध्यस्थीने आमदार आलेक्स सिक्वेरा हेही त्यांच्यात सामील झाले. काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीलाही ११ पैकी ७ आमदारांनी दांडी मारली होती. मात्र युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, रुडोल्फ फेर्नांडिस आणि संकल्प आमोणकर या चारपैकी एकही आमदार फुटण्यास तयार नसल्याने तूर्तास हे बंड थंडावले असल्याची खात्रीशीर माहिती सुत्रांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेत्याची तात्काळ हकालपट्टी; माजी मुख्यमंत्र्यांवरही कारवाई

दरम्यान या बंडानंतर कामत आणि लोबो या दोघांवरही पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून मायकल लोबो यांची गटनेता आणि विरोधी पक्षनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवाय या दोन्ही नेत्यांवर पक्षांतरी बंदी कायद्याच्या प्रक्रियेतून जी काही कारवाई असेल ती होणार असल्याची घोषणा गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केली आहे. दिगंबर कामत यांनी पाठीत खंजीर खुपसला अशी खंतही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

दिनेश गुंडूराव पुढे म्हणाले, आमचे किमान दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदार फोडण्यासाठी भाजपचे प्रयत्न होते. आमच्या अनेक लोकांना मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. ऑफर केलेली रक्कम ऐकून मला धक्का बसला आहे. पण आमचे ६ आमदार ठाम राहिले, मला त्यांचा अभिमान आहे. आम्ही आणखी काही आमदारांच्या संपर्कात आहोत आणि ते आमच्यासोबत असतील. आता नवा नेता निवडला जाईल, अशी माहितीही राव यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com