Himchal Pradesh Govt In Financial Crisis : हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे सुखविंदर सिंह सुक्खू सरकार सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनही देवू शकलेले नाही. कर्मचारी आणि पेन्शनर्सच्या बँक खात्यात दर महिन्याच्या एक तारखेला पगार आणि पेन्शन जमा होत असते.
परंतु सप्टेंबरची एक तारीख उलटूनही दोन लाख सरकारी कर्मचारी आणि जवळपास दीड लाख पेन्शर्सच्या बँक खात्यात पगार जमा झालेला नाही. आर्थिक संकटात सापडलेल्या राज्य सरकारमुळे हिमाचलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं आहे. आता कर्मचाऱ्यांचा पगार पाच सप्टेंबर रोजी होईल असं बोललं जात आहे.
सध्या हिमाचल प्रदेश सरकारवर जवळपास ९४ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. ज्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती प्रचंड खराब झालेली आहे. यामुळेच सरकारला जुने कर्ज फेडण्यासाठी नवी कर्ज घ्यावे लागत आहे. कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी राज्य सरकारवर जवळपास १० हजार कोटी रुपये देणे बाकी आहे. एवढे पैसे देवू शकत नसल्याने आता हिमाचल सरकारवर सातत्याने टीका होत आहे.
प्राप्त माहितीनुसार हिमाचल प्रदेश सरकारला प्रत्येक महिन्यास कर्मचाऱ्यांचाय पगारासाठी १२०० कोटी रुपये खर्च करावे लागतात. तर ८०० कोटी रुपये पेन्शन देण्यासाठी लागतात. आता असं मानलं जात आहे की हिमाचल प्रदेश सरकारला केंद्राकडून महसूल तूट अनुदानापोटी ५२० कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम पाच सप्टेंबर रोजीच हिमाचल सरकारच्या तिजोरीत येणार आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना आता पगारासाठी पाच सप्टेंबपर्यंत वाट पाहावी लागणार हे निश्चित.
हिमाचल प्रदेशात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची चर्चा संपूर्ण देशभरात सुरू आहे. अशावेळी प्रत्येकास हे जाणून घ्यायचे आहे की, राज्यात हे आर्थिक संकट अखेर कसं काय निर्माण झालं? तसेच, सध्या हिमाचल सरकार प्रचंड कर्जाखाली दबलेलं आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू(Sukhwinder Singh Sukkhu) सरकारने १५ सप्टेंबर २०२२ ते ३१ जुलै २०२४ पर्यंत एकूण २१ हजार ३६६ कोटी रुपये कर्ज घेतले आहे. तर सरकारने ५ हजार ८६४ कोटी रुपयांचे कर्ज परतही केले आहे. याशिवाय सरकारने जीएफ वरही १ जानेवारी २०२३ ते ३१ जुलै २०२४ पर्यंत २ हजार ८१० कोटी रुपये कर्ज घेतलेले आहे.
त्यामुळे आता असंही बोललं जात आहे की, लवकरच हिमाचल सरकारवरील कर्जाचा डोंगर वाढून तब्बल एख लाख कोटी रुपयांच्याही पुढे जाईल. विशेष म्हणजे हिमाचल सरकारला दर महिन्याला टॅक्स आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यूतून जवळपास १२०० कोटी रुपयांची कमाई होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.