नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीमत्वाविषयी अनेक किस्से, आठवणी सांगितल्या. पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासाविषयीच्या एका पुस्तक प्रकाशनप्रसंगी शहा यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ते किती संवेदनशील आहेत, याबाबतचा एक किस्साही त्यांनी सांगितला. (PM Narendra Modi Latest Marathi News)
पंतप्रधान कार्यालयात एक महत्वाची बैठक सुरू असतानाचा हा किस्सा आहे. अमित शहा हे त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. शहा म्हणाले, 'पंतप्रधान कार्यालयात बैठक सुरू असताना एक मोर आला आणि खिडकीवर चोच मारू लागला. पंतप्रधान मोदींनी हे दोन-तीनवेळा पाहिलं. त्यानंतर त्यांनी बेल वाजवून एका कर्मचाऱ्याला बोलावून घेतले. मोर भुकेलेला असेल त्याला खायला द्या, असं मोदींनी त्या कर्मचाऱ्याला सांगितले.' (Amit Shah reveals PM Narendra Modi’s sensitive side)
एका गंभीर विषयावर बैठकीतूनही पंतप्रधान मोदींनी मोराचा विचार केला. यावरून ते किती संवेदनशील आहेत हे दिसते, असं शहा म्हणाले. पंतप्रधान हे त्यांच्या निवासस्थानी एका मोराला खाऊ घालत असल्याचा व्हिडीओ 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
पंतप्रधान मोदींनीही केला एक गौप्यस्फोट
गुजरातमधील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षातील एका बड्या नेत्यानं सल्ला दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. देशानं तुम्हाला दोनदा पंतप्रधान बनवलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला आणखी काय हवं, असा सल्ला या नेत्यानं मोदींना दिला होता. पण मोदींनी या नेत्याचं नाव सांगितलं नाही.
कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, एकदा एक ज्येष्ठ नेते मला भेटले. ते राजकीयदृष्ट्या सतत आमच्या विरोधात असतात. पण मी त्यांचा आदर करतो. काही मुद्यांवर ते निराश होते. त्यामुळे ते मला भेटायला आले होते. भेटीत ते मला म्हणाले, देशाने तुम्हाला दोनदा पंतप्रधान बनवलं, त्यामुळं आता आणखी काय हवं?
या नेत्याचं मत असं होतं की, जर कोणी दोनवेळा पंतप्रधान बनले असेल तर त्यांनी सर्वकाही मिळवलं, असं मोदी यांनी पुढे बोलताना सांगितले. माझं स्वप्न कल्याणकारी योजनांचा शंभर टक्के फायदा लोकांपर्यंत पोहचवणे हे आहे. त्यांना माहिती नाही की, मोदी कोणत्या मातीचे बनले आहेत. गुजराच्या भूमीने मला बनवले आहे, असंही मोदी म्हणाले.
जे काही झालं ते झालं, आता मला आराम करायला हवा, या गोष्टींवर माझा विश्वास नाही. तुम्हाला मला आठ वर्षांपूर्वी गुजरातमधून दिल्लीत पाठवले आहे. ही आठ वर्षेला सेवा, गरीबांचे कल्याण आणि सुशासन याला वाहून घेतली असल्याचे मोदींनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.