
India vs Pakistan News : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराधांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने सर्व बाजूंनी पाकिस्तानची कोंडी करण्याची कठोर भूमिका घेतली आहे. यावर सुरुवातीला 'जशास तसे' प्रत्युत्तर देण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानने आता मात्र तपासात सहकार्य करण्याची भाषा सुरु केली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आज (शनिवार) यासंदर्भात एक भाष्य केले. "पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नि:पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी करण्यासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत", असे विधान शरीफ यांनी केले.
'मात्र तरीही भारताने आगळीक केल्यास आम्ही प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहोत', अशी दर्पोक्तीही शरीफ यांनी केली. "2019 च्या फेब्रुवारीमध्ये भारताने जसा आमच्यावर हल्ला केला होता, तसा पुन्हा केल्यास त्याचा सामना करण्यासाठी आमचे सैन्य सज्ज आहे', असे शरीफ म्हणाले.
काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने आक्रमक भूमिका घेत विविध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंधू नदी पाणी वाटप करार संपुष्टात आल्याची घोषणा भारताने केल्यानंतर पाकिस्तानमधून त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. भारताच्या या निर्णयाचे पाकिस्तानवर दूरगामी परिणाम होऊ शकतात. हे लक्षात आल्यानंतर पाकिस्तानमधून आता संयमाची भाषा सुरु झाली आहे.
पंतप्रधान शरीफ यांच्याआधी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा महंमद आसिफ यांनी 'न्यूयॉर्क टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत भारताशी सहकार्य करण्याची भूमिका मांडली होती. 'या प्रकरणात आंतरराष्ट्रीय निरीक्षकांकडून होणाऱ्या कोणत्याही चौकशीसाठी पाकिस्तान सहकार्य करेल' असे आसिफ यांनी म्हटले होते.
'दोन्ही देशांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी', असे आवाहन 'द डॉन' या पाकिस्तानमधील आघाडीच्या वृत्तपत्राने केले. 'सद्यस्थितीत दोन्ही देशांना युद्ध परवडणारे नाही. त्यामुळे चर्चा आणि सामंजस्याच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्याची गरज आहे' अशी भूमिका या वृत्तपत्राने मांडली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर भाषणातून पाकिस्तानला इशारा दिला. तसेच दहशतवादी जगाच्या पाठीवर कुठेही लपले तरीही त्यांना शोधून काढू, असेही मोदी म्हणाले. सध्या भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.