लखीमपूर खीरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्याने 3 ऑक्टोबरला आठ जणांना चिरडले होते. यात चार शेतकऱ्यांचा (Farmers) समावेश होता. मिश्रा यांचा मुलगा आशिष यातील एक गाडी चालवत होता, असा दावा करण्यात आला होता. अखेर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याने यावर शिक्कामोर्तब केले आहे.
लखीमपूर खीरीतील घटनेत तेजिंदर विर्क हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी या घटनेची आपबिती सांगितली आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना ज्या गाडीने चिरडले ती गाडी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष चालवत होता. आम्हाला मारण्याचाच कट त्यांनी आखला होता. शेतकऱ्यांना आंदोलन करुन देणार नाही, अशी धमकी अजय मिश्रा यांनी दिली होती. त्यांच्या या धमकीच्या विरोधात आम्ही आंदोलन करीत होते. ते जाणार असलेल्या मार्गावर आम्ही काळे झेंडे घेऊन थांबलो होतो. परंतु, त्यांनी ऐनवेळी मार्ग बदलल्याचे आम्हाला कळाले. आम्ही तेथून शांतपणे घरी जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या गाडीने आम्हाला चिरडले. जाणीवपूर्वक आमच्या अंगावर गाडी घालण्यात आली. त्या गाडीत अजय मिश्रांचा मुलगा आणि त्याचे सहकारी होते.
या घटनेनंतर संतापलेल्या जमावाने गाड्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. शेतकऱ्यांनीच त्यातील काही जणांना वाचवून त्यांना पोलिसांच्या हवाली केले. या घटनेला कारणीभूत असलेल्या केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी करावी. मी या प्रकरणी साक्ष देण्यासही तयार आहे. योगी आदित्यनाथ सरकार हल्लेखोरांना मदत करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
माझा मुलगा घटनास्थळी असल्याचा एक पुरावा दाखवा, मी लगेच मंत्रिपदाचा राजीनामा देतो, अशी भूमिका अजय मिश्रा यांनी घेतली आहे. ते म्हणाले की, मी अथवा माझा मुलगा घटनास्थळी नव्हतो याचा पुरावा आमच्याकडे आहे. आम्ही कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहोत. हा कट आखणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय रंग दिला जात आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. घटना घडली त्यावेळी मी उपस्थित नव्हतो. परंतु, मी तेथील व्हिडीओ पाहिले आहेत. भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला होता. माझ्या मुलाविरुद्ध केलेले सर्व आरोप निराधार आहेत. तो तिथे उपस्थित नव्हता. तो तिथे हजर असता तर आज तो जिवंत नसता.
मिश्रा यांचा मुलगा आशिष याने शेतकरी आंदोलकांना रिव्हॉल्वर दाखवून गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचाही आरोप होत आहे. यावर अजय मिश्रा म्हणाले की, माझ्या मुलाकडे रिव्हॉल्वर असेल तर त्याचा परवानाही असेल. या घटनेत समाजवादी पक्षाचे नेते आणि खलिस्तानी शक्तींचा हात आहे. या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण देण्यात आले आहे. देशातील 99 टक्के शेतकऱ्यांचा कृषी कायद्यांना पाठिंबा आहे. त्यांचे आंदोलन बंद पडू लागले त्यामुळे ते अशा प्रकारच्या घटना घडवत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.