राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यावरून कर्नाटक काँग्रेस आक्रमक झाले आहे. भारत सरकार मेले आहे का? असा प्रश्न काँग्रेसचे नेते सिध्दरामय्या यांनी उपस्थित करीत या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka) सीमाभागातील ८६५ गावात महात्मा फुले जनआरोग्य योजना, सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, मुख्यमंत्री सहाय्यता निधी या योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली होती. त्यास आता कर्नाटक काँग्रेसचे (Congress) नेते सिध्दरामय्या (Siddaramaiah) यांनी विरोध दर्शविला आहे.
सिध्दरामय्या यांनी म्हटले की, "महाजन आयोगाच्या अहवालानुसार कर्नाटक राज्यातील ८६५ गावांमध्ये महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली. आमच्याकडील गावांमध्ये महाराष्ट्र सरकार आरोग्य योजना लागू करणार आहे का? तसे असेल तर मग भारत सरकार मेले आहे का? कर्नाटक सरकार मेले आहे का? असे प्रश्न पडतात. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा."
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील नागरिकांसाठी राज्याच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, असा उदात्त हेतू शिंदे-फडणवीस सरकारचा आहे. त्यातून सरकारने ८६५ गावांतील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयास आता कर्नाटक काँग्रेसकडून खो देण्याची भूमिका घेतली जात आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिध्दरामय्या यांनी कर्नाटक सरकारसह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते काय भूमिका घेणार, याकडे दोन्ही राज्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.