Congress Vs BJP : दिल्ली येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे अधिवेशन झाले. या अधिवेशनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) उपस्थित होते. पंतप्रधान ओबीसी समाजाचे असूनही मागील 8 वर्षांत ओबीसींचे प्रश्न सुटले नसल्याची टीका पटोले यांनी केली.
नाना पटोले म्हणाले, देशभरात ओबीसींची संख्या जास्त असूनही आजपर्यंत या समाजावर अन्यायच झालेला आहे. मंडल आयोगामुळे 27 टक्के आरक्षण मिळाण्यास सुरवात झाली. मात्र हे आरक्षणही आज धोक्यात आल्याचे दिसते. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत तरीही ओबीसी समाजाला योग्य न्याय मिळालेला नाही. आज पंतप्रधानपदावर ओबीसी समाजाचा व्यक्ती असूनही 8 वर्षांत समाजाला काय मिळाले ? जोपर्यंत जातीनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही, असे मत त्यांनी मांडले.
ते पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाला न्याय व हक्क मिळावेत यासाठी आपण झटले पाहिजे. सध्या आरक्षणाचा मुद्दा वादाचा ठरत आहे. केंद्रातील सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विमा कंपनी, रेल्वेसह सर्व सरकारी उपक्रमांचे खाजगीकरण करत आहे. खासगीकरण केल्यानंतर आरक्षणच राहणार नाही. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आहे तर राजकीय आरक्षणाचाही गुंता वाढलेला आहे.
न्यायालयात ओबीसींच्या संख्येचा वाद पुढे येतो म्हणून जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यासाठी आग्रही राहिले पाहिजे. विधानसभेचा अध्यक्ष असताना जातीनिहाय जनगणना करण्याचा ठराव मांडून तो मंजूर करून घेतला व त्यानंतर देशभरात तशा प्रकारचे ठराव करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
देशातील बहुतांश लोक शेतीवर उपजिवीका करत असून धान्य पिकवण्याचे काम शेतकरी करतो. त्याच्या धान्यावर कर लावून फायदा मात्र व्यापाऱ्यांचा होत आहे आणि गरिबांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला जात आहे. भाजपचे नेते देशाला ओबीसी पंतप्रधान मिळाला म्हणून गाजावाजा करत आहेत मात्र मोदींच्या काळात ओबीसींच्या हिताचा एकही निर्णय होत नाही त्यामुळे नरेंद्र मोदी खरेच ओबीसी आहेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शेती करणाऱ्यांमध्ये सर्वांत जास्त ओबीसी समाजच आहे. देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्र महत्वाचे आहे मात्र त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यावर मंथन होणे गरजेचे आहे. शेतकरी सर्व बाजूंनी नाडला जात आहे, त्याच्यावर अत्याचार वाढले आहेत, असे त्यांनी सांगितले.
ओबीसींचे आरक्षण घालविण्यास भाजप जबाबदार
भाजप व देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजाबद्दल दाखवत असलेले प्रेम खोटे आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवण्यात भाजप व फडणवीस हेच जबाबदार आहेत. पाच वर्ष सत्तेत असताना ओबीसी आयोगासाठी त्यांनी काहीही केलेले नाही. केंद्र सरकार कडील आकडेवारी मिळवण्यातही त्यांनी फारसे प्रयत्न केले नाहीत. राज्यात सध्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा गुंता झाला आहे त्याची सुरवात फडणवीस सरकारच्या काळात 2017 पासूनच झाली, त्यांच्यामुळेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस ओबीसी समाजासाठी अनेक निर्णय घेतल्याचा दावा करतात मात्र त्यात फारसे तथ्य नाही. फडणवीस हे सातत्याने खोटे बोलतात. ओबीसी आरक्षणाबाबत ते दिशाभूल करणारी माहिती देत असतात. महाराष्ट्रात भाजप सरकार असताना ओबीसी मंत्रालयाची घोषणा केली मात्र हे मंत्रालय केवळ नावालाच राहिले. नरेंद्र मोदी यांना ओबीसी मंत्रालयासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सकारात्मकता दाखवली नाही. ओबीसी मंत्रालय झाले तर समाजासाठी विविध योजना राबविल्या जाऊ शकतात. शेवटी समाजाने आपल्याला काही दिलेले आहे त्याची परतफेड करण्यासाठी समाजाच्या हितासाठी काम करा, असे आवाहनही पटोले यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.