Vidhan Sabha Election 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्यात आल्यापासून आतापर्यंत तिथे विधानसभा निवडणूक झालेली नाही. प्रदीर्घ काळापासून जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची प्रतीक्षा आहे. यादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे.
प्राप्त माहितीनुसार जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र आणि हरियाणासोबतच घेतली जाऊ शकते. तर झारखंड विधानसभा निवडणूक ही स्वतंत्ररित्या घेतली जाण्याची शक्यता आहे. याबाबत २० ऑगस्ट रोजी अंतिम निर्णय होणार आहे.
सध्या निवडणूक आयोगाचे अधिकारी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. यानंतर ते महाराष्ट्र आणि हरियाणाचाही दौरा करणार आहेत. १२-१३ ऑगस्ट रोजी हरियाणाचा दौरा प्रस्तावित आहे. तर हरियाणानंतर निवडणूक आयोग महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. ऑक्टोबरमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी(Vidhan Sabha Election) मतदान होण्याची शक्यता आहे, तर सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्येही मतदान होऊ शकते.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची टीम जम्मू-काश्मीरला पोहचली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह तिन्ही निवडणूक आयुक्त राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांसोबत बैठक करणार आहेत.
बैठकीसाठी नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेसह अन्य पक्षाचे नेते पोहचले आहेत. ही बैठक शेर-ए-कश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये होणार आहे. निवडणूक आयोग पोलीस अधिकारी आणि सुरक्षा दलांसोबतही बैठक करेल. उद्या अडीच वाजता निवडणूक आयोग पत्रकारपरिषद घेणार आहे.
जून २०२४मध्ये निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणासह जम्मू-काश्मीरमध्ये मतदान याद्या अद्ययावत करण्याचे आदेश दिले होते. 20 ऑगस्ट ही त्यासाठी मुदत होती. डिसेंबर २०२३मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की लवकरच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या जातील. न्यायालयाने असेही निर्देश दिले होते की, जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा.
२०१९मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं होतं. याशिवाय राज्याला जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन भागांमध्ये विभागलं गेलं होतं. केंद्राने स्पष्ट केलं की जम्मू-काश्मीरमध्ये दिल्ली-पुदुच्चेरीप्रमाणे उपराज्यपाल राजवट असेल. मात्र, जनता निवडणुकीतून मुख्यमंत्र्यांची निवड करू शकते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.