नवी दिल्ली : केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा केली असून, यावरून गदारोळ सुरू झाला आहे. काही जणांनी पद्म पुरस्कार नाकारला असून, काहींना तो मिळाल्यावरून वाद सुरू झाला आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांना पद्मभूषण मिळाल्यावरून चर्चेला उधाण आले आहे. आझाद यांना हा सन्मान मिळाल्यानंतर काँग्रेस (Congress) नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी पक्षावरच निशाणा साधला आहे.
कपिल सिब्बल आणि आझाद हे दोघेही काँग्रेसच्या जी-23 बंडखोर गटातील आहेत. आझाद यांनी पद्मभूषण मिळाल्याबद्दल सिब्बल यांनी आनंद व्यक्त केली आहे. याचवेळी त्यांनी पक्षाला आरसा दाखवण्याची संधीही सोडलेली नाही. त्यांनी म्हटले आहे की, गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण. अभिनंदन भाईजान! त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाबद्दल देश त्यांचा गौरव करीत असताना काँग्रेस पक्षाला त्यांची सेवा नको आहे, हे दुर्दैव.
रमेश यांचा आझाद यांच्यावर निशाणा
दरम्यान, आझाद यांचे सहकारी जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालचे (West Bengal) माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्म भूषण पुरस्कार जाहीर नाकारला आहे. पुरस्काराबाबत आपल्याला कळवलेच नसल्याचे कारण देत त्यांनी हा पुरस्कार घेण्यास नकार दिला. हेच निमित्त साधत जयराम रमेश यांनी आझादांना लक्ष्य केलं. भट्टाचार्य यांनी पुरस्कार नाकारल्याचे एक ट्विट रिट्विट करत रमेश यांनी म्हटलं आहे की, 'योग्य पाऊल उचललं. त्यांना आझाद राहायचं आहे, गुलाम नव्हे.'
जयराम रमेश यांच्या या ट्विटवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आझाद हे जी-23 या बंडखोर नेत्यांच्या गटातील नेते आहेत. त्यामुळे रमेश यांचे हे ट्विट त्याला उद्देशून असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे काँग्रसेचे नेते खासदार शशी थरूर यांनी आझाद यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सार्वजनिक सेवेतील योगदानाचा दुसऱ्या पक्षाच्या सरकारने सन्मान करणं कौतुकास्पद आहे, असं ट्विट शरूर यांनी केलं आहे.
संध्या मुखर्जी यांनीही नाकारला पुरस्कार
90 वर्षांच्या प्रसिध्द बंगाली गायिकेने पुरस्कार नाकारल्याचे समोर आले आहे. बंगालमधील प्रसिध्द गायिका संध्या मुखर्जी यांनाही पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार होता. पण त्यांनी हा पुरस्कार नाकारला. पद्म पुरस्कार नाकारणारे दोघेही बंगालमधील आहेत. मुखर्जी यांच्या कन्या सौमी सेनगुप्ता यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली. आईनेच हा पुरस्कार स्वत:हून नाकारल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, यावर्षी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मविभूषण पुरस्कार ४ जणांना जाहीर झाला आहे. तर पद्मभूषण पुरस्कार १७ जणांना जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय पद्मश्री हा पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे. पण आता या पुरस्कारांवरून वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.