Bhopal : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या (Madhya Pradesh Assembly Election) बहुतेक एक्झिट पोलमध्ये (Exit Poll 2023) सत्ताधारी भाजपला (BJP) पुन्हा सत्ता मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर काही पोलमध्ये काँग्रेसला काटावर सत्ता मिळेल, असे आकडे दाखविण्यात आल्याने काँग्रेसच्याही (Congress) आशा उंचावल्या आहेत. दोन्ही पक्षांतील नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, 'लाडली बेहना योजना'च (Laadli Behna Scheme) आपल्याला तारणार असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्टपणे दिसत आहे.
एक्झिट पोलमधून निवडणूक निकालाचे अंदाज समोर आल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात 'काँटे की टक्कर' नसल्याचे विधान केले आहे. याचा अर्ज भाजपला या निवडणुकीत घवघवीत यश मिळणार असल्याची आशा त्यांना आहे. हा विश्वास त्यांना आपल्या लाडली बेहना योजनेने दिलेला दिसतो. 'लाडली बेहनाने सारे काँटे निकाल दिये,' (लाडक्या बहिणीने विजयाच्या मार्गातील सर्व काटे काढून टाकले), हे चौहान यांचे सूचक वक्तव्य खूप काही सांगून जाते. चौहान यांनी निकालाआधीच लाडली बेहना योजनेला म्हणजेच महिलांना विजयाचे श्रेय दिले आहे.
मध्य प्रदेशात २ कोटी ७१ लाख महिला मतदार आहेत. लाडली बेहना या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे १ कोटी ३० लाख महिलांना दर महिन्याला १२५० रुपये मिळतात. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. ही रक्कम तीन हजार रुपये करण्याचे आश्वासन चौहान यांच्याकडून प्रचार सभांमध्ये देण्यात आले आहे. त्यात काँग्रेसही मागे राहिली नसून घोषणापत्रात ही रक्कम १५०० रुपये करण्यात येतील, अशी घोषणा करण्यात आली. त्यामुळे चौहान यांची ही योजना महिलांमध्ये लोकप्रिय झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ही योजना भाजपची तारणहार ठरणार, असा विश्वास त्यांना आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
प्रत्यक्षात निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राज्यात सरकारविरोधी लाट दिसत होती. भाजपने सुरुवातीला मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणत्याही नेत्याला पुढे केले नव्हते. 'एमपी के मन में मोदी, मोदी के मन में एमपी' अशी घोषणा देत सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढविली जात असल्याचे प्रचार सभांमधून दिसू लागले. शिवराज सिंह चौहान बॅकफूटवर गेल्याचे जाणवत होते, पण मतदानाचा दिवस जवळ येत गेल्यानंतर भाजपला निवडणूक जड जात असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रचार सभांमध्ये पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून चौहान यांच्या नावाचा जाणीवपूर्वक उल्लेख केला गेला. विशेष म्हणजे लाडली बेहना योजना त्यास कारणीभूत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
दरम्यान, काँग्रेसने या निवडणुकीत ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढविली. त्यांनीही मागील तीन वर्षांत चौहान सरकारविरोधात रान उठवत काँग्रेसला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. भाजपचे फोडाफोडीचे राजकारण, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेसने प्रचारात लक्ष केंद्रित केले होते. सरकारविरोधी लाट असल्याचा दावा करत कमलनाथ यांनीही विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
कमलनाथ यांनी एक्झिट पोलचे अंदाज फेटाळून लावत हे दबावतंत्र असल्याचे म्हटले आहे. भाजप ही निवडणूक हारली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी निराश होऊन गाफील राहावे आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जावा, यासाठी एक्झिट पोल तयार करण्यात आले आहेत, पण हे षडयंत्र यशस्वी होणार नाही. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकजूट राहत निष्पक्षपणे मतमोजणी होईल, यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन कमलनाथ यांनी केले आहे.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.