
Bihar elections 2025 : निवडणूक रणनीतिकार अन् जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे प्रमुख नितीश कुमार यांच्याबाबत पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. ज्यामळे केंद्रातील सत्ताधारी एनडीए आघाडीचं टेन्शन वाढू शकतं. तर बिहारच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
प्रशांत किशोर(Prashant Kishor) यांनी पश्चिम चंपारण जिल्ह्यातील एका पत्रकारपरिषदेत बोलताना दावा केला की, मुख्यमंत्री नितीश कुमार आगामी विधानसभा निवडणूक भाजपसोबत लढतील, मात्र निकालानंतर ते पुन्हा एकदा बाजू बदलू शकतात.
तसेच प्रशांत किशोर यांनी असेही म्हटले की, नितीश कुमार(Nitish Kumar) पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यांची लोकप्रियता एवढी घसरली आहे की, त्यांनी कोणासोबतही आघाडी केली तरी त्यांना जनता आता पाचव्यांदा मुख्यमंत्रिपदाची संधी देणार नाही. याशिवाय प्रशांत किशोर यांनी असेही म्हटले की, कोणीही मुख्यमंत्री बनू शकतो, मात्र नितीश कुमार नाही. हे तुम्ही लिहून घ्या. जर माझा हा दावा चुकीचा ठरला तर माझी राजकीय वाटचाल तिथेच संपवेन.
भाजपकडून(BJP) नितीश कुमार यांना एनडीएचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलं जाणार नाही, अशा चर्चांवर प्रशांत किशोर यांनी म्हटले की, नितीश कुमार भाजपसोबतच निवडणूक लढवतील. 2015 सोडून त्यांनी नेहमीच भाजपसोबत मिळून निवडणूक लढवली आणि 2015मध्येही मी स्वत: त्यांची निवडणूक रणनिती आखली होती.
याचबरोबर प्रशांत किशोर यांनी हे देखील म्हटले की, भाजप नितीश कुमार यांची घसरत चाललेली लोकप्रियता पाहूनच त्यांना आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करत नाही. तसेच, प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान देत म्हटले की, जर हिंमत असेल तर घोषणा करा की नितीश कुमार पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील. जर असं केलं तर भाजपसाठी जागा जिंकणं अवघड होईल.
प्रशांत किशोर यांनी असाही दावा केला की यावेळी जदयूची स्थिती अतिशय वाईट असणार आहे. त्यांनी म्हटले की जर निकाल नितीशकुमार यांच्या विरोधात आला तर ते पुन्हा बाजू बदलण्याचा प्रयत्न करू शकतात. परंतु जेदयूला एवढ्या कमी जागा मिळतील की नितीश कुमार यांना कोणत्याही आघाडीत मुख्यमंत्रिपद मिळणार नाही.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.