President's Rule : 'राष्ट्रपती राजवट' कुणाच्या कार्यकाळात सर्वाधिक वेळा लागू झाली, काँग्रेस की भाजपा?

Section 356 : जाणून घ्या, देशातील राष्ट्रपती राजवटीचा इतिहास
President's Rule
President's RuleSarkarnama
Published on
Updated on

History of President's Rule in India : शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकार बरखास्त करून, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जावी, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर आपण राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? ती कधी लागू केली जाते, देशातील राष्ट्रपती राजवटीचा संपूर्ण इतिहास आणि सर्वाधिक वेळा कुठे राष्ट्रपती राजवट लागू झाली, कोणी लागू केली हे जाणून घेऊयात.

देशभरात आतापर्यंत 132 वेळा विविध राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. यामध्ये जवळपास 90 वेळा राष्ट्रपती राजवट ही केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना लागू झालेली आहे. तर इंदिरा गांधी यांनी सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

President's Rule
Uddhav Thackeray : घोसाळकरांच्या हत्येनंतर ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी; 'सरकार बरखास्त करा अन्...'

'कलम 356' म्हणजे नेमकं काय? -

'कलम 356' ज्याला सर्वसाधरण भाषेत 'राष्ट्रपती शासन' म्हटलं जातं. या अंतर्गत एखाद्या राज्यात घटनात्मक यंत्रणा बिघडल्यास किंवा घटनेचे उल्लंघन झाल्यास, तेथील सरकार बरखास्त केले जाऊ शकते. जेव्हा एखाद्या राज्यात अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. त्यानंतर राष्ट्रपती राजवट संबंधित राज्यात लागू होते.

सर्वसाधारणपणे राष्ट्रपती राजवटीचा कालवधी हा सहा महिन्यांसाठी असतो. परंतु जर संबंधित राज्यातील परिस्थिती सुधारली नाही तर हा कालावधी सहा – सहा महिन्यांसाठी तीन वर्षांपर्यंतही वाढवता येतो. ज्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाते, तेथील सर्व व्यवस्था ही राष्ट्रपतींच्या हाती जाते. परंतु राष्ट्रपती हे मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार काम करतात. याचाच अर्थ येथील संपूर्ण कारभार हा केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली जातो. राष्ट्रपती राजवट कधीही हटवली जाऊ शकते.

राष्ट्रपती राजवट कधी लागू होते? -

सर्वसाधरणपणे राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे दोन आधार असतात. पहिला, राज्य सरकारचे कामकाज घटनेला अनुसरून सुरू नसल्याचा राज्यपालांचा अहवाल राष्टपतींकडून स्वीकारला जातो. आणि दुसरे म्हणजे, केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन किंवा ते लागू करण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असेल तेव्हा. दुसऱ्या कारणाचा उल्लेख कलम 365मध्ये आहे.

याशिवाय विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळाले नाही आणि विधानसभा मुख्यमंत्र्यांची निवड करू शकली नाही, तर अशावेळी राष्ट्रपती राजवट लागू शकते.

President's Rule
Amit Shah On CAA : सीएए कायद्याबाबत अमित शाहांची मोठी घोषणा; देशात लवकरच...

पहिल्यांदा कलम 356 चा वापर कधी? -

कलम 356 चा वापर सर्वात पहिल्यांदा पंजाबमध्ये 20 जून 1951 मध्ये झाला होता. तेव्हा 302 दिवस राष्ट्रपती राजवट लागू होती. याशिवाय 1959 मध्ये केरळ राज्यात लोकशाही पद्धतीने निवडले सरकार कलम 356चा वापर करून बरखास्त केले गेले होते. असं म्हटलं जातं की 1970 आणि 1980 च्या दशकात विरोधी सरकारांना पाडण्यासाठी केंद्र सरकारकडून घटनेच्या या कलमाचा प्रचंड दुरुपयोग केला गेला. कलम 356 चा सर्वाधिक दुरुपयोग करण्याचा आरोप माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर केला जातो.

बहुतांशवेळा केंद्रात काँग्रेसचेच सरकार -

इंदिरा गांधी(Indira Gandhi) यांचा आणीबाणीच्या अगोदर आणि नंतर पंतप्रधान म्हणून जवळपास 15 वर्षांचा कार्यकाळ राहिलेला आहे. यादरम्यान 1966 ते 1977 मध्ये 36 वेळा आणि 1980 ते 1984 दरम्यान 15 वेळा विविध राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लावल्या गेली. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत जेव्हा जेव्हा राष्ट्रपती राजवट लावली गेली, तेव्हा बहुतांशवेळा केंद्रात काँग्रेसचेच सरकार होते. मात्र तरीही असे अजिबात नाही की कलम 356 चा दुरुपयोग केवळ काँग्रेस सरकारकडूनच केला गेला.

एकाचवेळी तब्बल 9 राज्यांमध्ये -

आणीबाणीनंतर जनता पार्टीचे सरकार बनले आणि मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. जनता पार्टीच्या सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात 21 वेळा राष्ट्रपती राजवट लावली गेली. या तीन वर्षांत सहा महिन्यांसाठी चौधरी चरण सिंह हे सुद्धा काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधान बनले होते. यानंतर जनता पार्टीचे सरकार पडले आणि 1980मध्ये इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी एकाचवेळी तब्बल 9 राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लावली होती.

मोदी सरकारच्या कार्यकाळात किती वेळा? -

कलम 356चा वापर करण्यात भाजपही मागे नाही, अटल बिहारी वाजपेयी(Atal Bihari Vajpayee) सरकारच्या काळात याचा पाच वेळा वापर केला गेला. यानंतर 2014 मध्ये पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि महाराष्ट्र याचे उदाहरणं आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदा 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 पर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील मतभेदांमुळे सरकारने बहुमत गमावले होते आणि तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली होती. मोदी सरकारच्या कार्यकाळात आतापर्यंत दहा वेळा कलम 356चा वापर केला गेला आहे.

देशात सर्वाधिकवेळा कोणत्या राज्यात लागू? -

देशात दोन राज्य अशी आहेत, जिथे आतापर्यंत राष्ट्रपती राजवट लागलेली नाही. ती राज्ये म्हणजे छत्तीसगड आणि तेलंगणा. देशाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक काळ जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती. जिचा कालवधी 6 वर्षे 264 दिवस होता. याशिवाय सर्वात कमी कालावधीची राष्ट्रपती राजवट ही कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये सात दिवसांची होती. तर आतापर्यंत सर्वाधिकवेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेले राज्य म्हणेज उत्तर प्रदेश आणि मणिपूर हे आहेत, जिथे प्रत्येकी दहावेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com