केंद्र म्हणतेय, कोळशाची टंचाई नाही अन् दुसरीकडे रेल्वेच्या 670 फेऱ्या रद्द करण्याची वेळ

कोळसा वाहतुकीसाठी रेल्वेचे रेक उपलब्ध होत नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.
Coal Shortage
Coal ShortageSarkarnama

नवी दिल्ली : कोळशाच्या टंचाईमुळे (Coal Shortage) महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांवर वीजटंचाईचे (Power Crisis) संकट ओढावले आहे. कोळसा वाहतुकीसाठी रेल्वेचे (Railway) रेक उपलब्ध होत नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. विजेच्या वाढत्या मागणीमुळे वीजनिर्मिती केंद्रांकडून कोळसा पुरवठ्याची मागणीही वाढली आहे. परिमाणी रेल्वे रेक कमी पडू लागल्याने ही वाहतूक अधिक वेगाने व्हावी, यासाठी रेल्वे मंत्रालयाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

कोळसा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांच्याकडून केला जात आहे. सध्या देशावर विजेचं संकट नसल्याचंही त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. पण राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, झाऱखंड, बिहार यांसह अन्य काही राज्यांमध्ये कोळसा कमी पडू लागला आहे. दिल्लीमध्ये केवळ एक दिवसाचा साठा असल्याचा दावा ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी केला आहे.

Coal Shortage
राजधानीत विजेचं संकट गडद; रुग्णालयांना दिला सतर्कतेचा इशारा

ही स्थिती लक्षात घेऊन वीज प्रकल्पांना तातडीने कोळसा पुरवठा करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. रेल्वेकडून मागील पंधरा दिवसांपासून दररोज जवळपास 16 मेल किंवा एक्सप्रेस गाड्या रद्द केल्या जात आहेत. कोळसा वाहतूक वेगाने व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 24 मेपर्यंत सुमारे 670 प्रवासी रेल्वेगाड्या रद्द केल्या जाणार असल्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे 500 हून अधिक गाड्या लांबपल्ल्याच्या आहेत.

रेल्वेकडून कोळसा वाहतुकीसाठी रेकही वाढवण्यात आले असून हा आकडा 400 पर्यंत पोहचला आहे. मागील पाच वर्षांतील रेकची ही संख्या सर्वाधिक असल्याची माहिती रेल्वेतील सुत्रांनी दिली. प्रत्येक रेकमध्ये सुमारे साडे तीन हजार टन कोळसा असतो. पुढील दोन महिने हा अशाचपध्दतीने पुरवठा सुरू राहील. काही राज्यांमध्ये गाड्या रद्द केल्याने आंदोलनही झाले. पण आमच्याकडे पर्याय नाही. देशभरात ठिकठिकाणी कोळसा खाणी असल्याने रेल्वेला वीज प्रकल्पांपर्यंत कोळसा पोहचवण्यासाठी तीन ते चार दिवस वाहतुकीत जात आहेत.

Coal Shortage
महाराष्ट्राच्या चोराच्या उलट्या बोंबा! भागवत कराडांनी दिले आकडे

दरम्यान, राजधानी दिल्लीत विजेचं संकट अधिक गडद होत चालले असून सरकारने रुग्णालये, मेट्रो सेवेसह सर्व महत्वाच्या आस्थापनांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दिल्ली (Delhi) सरकारने गुरूवारी केंद्र सरकारला पत्र लिहून पुरेसा कोळसा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ऊर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी तातडीची बैठक घेत स्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर दोन ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाच्या टंचाईमुळे ऊर्जा निर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत महत्वाच्या संस्था, दिल्ली मेट्रो, सरकारी रुग्णालयांमध्ये वीज टंचाई निर्माण होऊ शकते, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

दिल्लीतील 25 ते 30 टक्के ऊर्जा पुरवठा या प्रकल्पांमधून होतो. तिथे कोळशाची टंचाई जाणवत असल्याचे जैन यांनी सांगितले. सरकारकडून सातत्याने स्थितीचा आढावा घेतला जात असून आवश्यक पावले उचलली जात आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पंजाबमध्ये शेतकऱ्यांना फटका बसू लागला असून किसान मजदूर संघर्ष समितीकडून शुक्रवारी ऊर्जा मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केले जाणार आहे. पंजाबमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी विजेच्या मागणीत 40 टक्के वाढ झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com