मॉस्को : युक्रेनवरील (Ukraine) हल्ल्याच्या बाराव्या दिवशी रशियाने (Russia) सोमवारी मोठी घोषणा केली आहे. भारतासह इतर देशांमधील नागरिकांना युक्रेनबाहेर पडता यावे यासाठी रशियाने राजधानी कीवसह चार शहरांमध्ये युध्दविरामाची घोषणा केली आहे. दुपारी साडेबारा वाजल्यापासून हा या शहरांमधील हल्ले थांबवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली. (Russia's Ceasefire)
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्या विनंतीनंतर कीव, खारकीव, सुमी आणि मारियुपोल या शहरांमध्ये हल्ला थांबवला जाणार आहे. दुपारी साडे बारा वाजल्यानंतर चार शहरांमध्ये मानवी कॉरिडॉर करण्यात येणार आहे. या कालावधीत अन्य देशांतील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडणे शक्य होणार आहे. भारताचेही अनेक विद्यार्थी व नागरिक या शहरांमध्ये अडकून पडले आहेत. (Russia Ukraine War)
दरम्यान, रशियाकडून क्षेपणास्त्र डागत व्हिनित्सिआ विमानतळ उध्दस्त करण्यात आल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी दिली. रशियाकडून इतर शहरांमधील हल्ले सुरूच ठेवण्यात येणार आहेत. आम्ही आमचे उद्दिष्ट चर्चा किंवा युध्दाच्या माध्यमातून साध्य करूच, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी स्पष्ट केलं आहे. सोमवारी दोन्ही देशांमध्ये चर्चेची तिसरी फेरी होणार आहे. (Russia Ukraine War Update)
रशियातील नागरिकांवर निर्बंध
अमेरिकेसह युरोपीय देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे रशियातील आर्थिक घडी विस्कटू लागली आहे. बँकांचे कामकाज प्रभावि झाले असून एटीएमबाहेर लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यातच आता नागिरकांना खाद्यपदार्थ किंवा इतर संबंधित वस्तू खरेदी करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. रशियाने दुकानांमध्ये वस्तू खरेदी करण्याबाबतची सीमा निश्चित केली आहे. खाद्यान्नाचा काळबाजार होण्याची भीती व्यक्त करण्यात आल्याने हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक व्यक्तीने किती फूड पॅकेट घ्यावेत, हे निश्चित करण्यात आले आहे. मागील काही आठवड्यात अनेकांनी खाद्यान्नाची मोठी खरेदी केल्याचे आढळून आल्याची माहिती रशियाच्या उद्योग मंत्रालयाकडून देण्यात आली.
रशियातील उद्योग व कृषी मंत्रालयाने या निर्णयाचे समर्थन केलं आहे. रशियामध्ये अत्यावश्य़क खाद्यान्नाच्या किंमत सरकार ठरवते. त्यामध्ये ब्रेड, तांदूळ, पीठ, अंडी, काही मांसाहारी व दुधाशी संबंधित पदार्थांचा समावेश आहे. इतर देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांमुळे रशियाला हे पाऊल उचलावे लागले आहे. पुतीन यांनी इतर देशांनी टाकलेल्या निर्बंधांवर टीका केली आहे. हे निर्बंध म्हणजे एकप्रकारे युध्दाची घोषणा केल्यासारखेच आहे, असं ते म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.