लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पुढील वर्षाच्या सुरवातीला विधानसभा निवडणूक (Assembly Election) होत आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) प्रमुख व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. आता त्यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाने छापासत्र (IT Raids) सुरू केले आहे. यावरून यादव यांनी भाजपवर (BJP) पलटवार केला आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, निवडणुका आल्या की हे सगळे सुरू होते. आता तर फक्त प्राप्तिकर विभाग (Income Tax) आला आहे. यानंतर सक्त वसुली संचालनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) येईल. मात्र, सायकल थांबणार नाही आणि तिचा वेगही कमी होणार नाही. उत्तर प्रदेशातून भाजपचे नामोनिशाण मिटेल. राज्यातील जनता आता मूर्ख बनणार नाही. राजीव राय यांच्यावर महिनाभर आधीच छापे का घालण्यात आले नाहीत. आता छापे घालण्याचे कारण म्हणजे जवळ आलेली निवडणूक आहे.
समाजवादी पक्षाचे प्रवक्ते राजीव राय, अखिलेश यादव यांचे स्वीय सहाय्यक जैनेंद्र यादव आणि मनोज यादव यांच्यावर प्राप्तिकर विभागाने आज सकाळी छापे घातले. वाराणसीतील प्राप्तिकर विभागाचे पथक राजीव राय यांच्या मऊ जिल्ह्यातील घरी सकाळी पोचले. राय यांच्या कर्नाटकात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यांनी 2014 मध्ये घोसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मनोज यादव हे आरएमसीएल समूहाचे प्रमुख आहेत. त्यांच्या मैनपुरी येथील घरावर छापे टाकण्यात आले आहे.
या छाप्यानंतर बोलताना राय म्हणाले की, माझी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तसेच, माझ्याकडे काळा पैसाही नाही. मी लोकांना मदत करीत आहे आणि हेच सरकारला आवडत नाही. हा याचाच परिपाक आहे. तुम्ही काही केले तर ते व्हि़डीओ तयार करतात आणि तुम्हाला एफआयआर करून अडकवतात. तुम्ही नंतर मग अनावश्यक असलेला खटला लढत राहता.
दरम्यान, अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अखिलेश यादव हे आझमगडमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत. याआधी त्यांनी कधीही विधानसभा निवडणूक लढवलेली नाही. ते आता पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आहेत. राष्ट्रीय लोक दलासोबत (आरएलडी) जागावाटप आघाडी अंतिम झाल्याची घोषणाही अखिलेश यादव यांनी केली आहे. अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांच्या प्रगतीशील समाजवादी पक्ष लोहिया या पक्षासोबतही त्यांनी आघाडी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.