Maratha Reservation Protest : 'उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी अशा जिल्हास्तरावरील शासकीय वाहनांवर, मालमत्तांवर हल्ले होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा विषय हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर देशाचा विषय आहे. त्यांच्या उपोषणामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज पेटलेला आहे. हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये गुंतलेल्या पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आधी महाराष्ट्रातली आग शमवावी', असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
'मनोज जरांगे पाटील यांचे प्राण आणि महाराष्ट्राची सार्वजनिक मालमत्ता यापेक्षा पाच राज्यांच्या निवडणुका महत्त्वाच्या वाटताहेत? प्रचार महत्त्वाचा वाटतो? पंतप्रधान आणि गृहमंत्री महाराष्ट्रातील या समस्येसाठी, मनोज जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्यासाठी ते एक तास देऊ शकत नाही? हा महाराष्ट्रावर, मनोज जरांगे पाटलांवर सूड घेण्याचा प्रयत्न दिसतोय', असा आरोप संजय राऊत यांनी केला.
'केंद्र सरकारला जनतेचा आक्रोश दिसत नाही. काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग सुरू आहे. मणिपूर जळतंय, महाराष्ट्र जळतोय आणि पंतप्रधानांसह संपूर्ण भाजप पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये घोषणाबाजी करत बसलेत?', अशी टीका संजय राऊत यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'मराठा आंदोलन आता सरकारच्या हाताबाहेर गेलेलं आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात राज्य पेटलेलं असताना त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हात चोळत बसले होते आणि राज्य पेटताना पाहत होते. त्याच पद्धतीने आज ते पाहत आहेत. अनेक महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्रात घडत असताना देवेंद्र फडणवीस हे रायपूरला जाऊच कसे शकतात? एवढा निगरगट्टपणा आला कुठून महाराष्ट्राच्या राजकारण्यांमध्ये. मोक्याच्या वेळी अजित पवार यांना डेंग्यू होतो. आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री हे रायपूरला प्रचाराला जाता आणि राज्य वाऱ्यावर सोडून निघून जातात', अशी टीका संजय राऊत यांनी केली.
'मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदारांनी राजीनामा देऊ केला आहे. हे सर्व ढोंग आहे. ही सगळी भाजपची पिलावळं आहेत. त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. हे मस्तवाल आहेत. मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. प्रश्न सोडण्यात त्यांना अपयश आलं आहे आणि राज्यात हिंसाचार सुरू आहे. मराठा चेहरा आहे म्हणून भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, पण आता मराठ्याच्या तोंडाला फेस आला आहे. मरतोय मराठा, जळतोय मराठा... अन् अपयशी ठरतोय एक मराठा मुख्यमंत्री. हा कसला चेहरा आहे? २०२४ च्या निवडणुकीत भाजप पूर्णपणे पराभूत होतोय. आणि त्याचं श्रेय एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन मराठ्यांना जाईल', असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.