शहा म्हणतात, जाहिराती करून केजरीवाल लोकांना फसवताहेत...

BJP : दिल्लीत भलेही 'आप' सरकार असले तरी 'वर' नरेंद्र मोदी आहे.
Arvind Kejriwal & Amit Shah Latest News
Arvind Kejriwal & Amit Shah Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी देशातील नरेंद्र मोदी सरकार कटिबद्ध आहे तर आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीला आपनिर्भर बनवले, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. दिल्लीत भलेही 'आप' सरकार असले तरी 'वर' नरेंद्र मोदी आहे. त्यामुळे दिल्लीकरांची विकासाची कामे रोखली जाणार नाही, त्याबद्दल दिल्लीकरांनी निश्चिंत राहावे, असा टोला त्यांनी लगावला. (Arvind Kejriwal & Amit Shah Latest News)

केंद्र सरकारतर्फे दिल्लीत कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे (वेस्ट टु एनर्जी प्लांट) उद्घाटन शहा यांच्या हस्ते आज झाले. तेहखंड भागात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात रोज 25 मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. या निमित्ताने शहा यांनी आगामी महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा शंखनाद केला. या निवडणुकीत भाजपा आणि आप यांच्यात थेट लढत असून भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने ही महापालिका निवडणूकही प्रतिष्ठेची केली आहे.

केजरीवाल सरकार मोठमोठ्या आणि करोडो रुपयांच्या जाहिराती देऊन दिल्लीकरांची दिशाभूल करत असल्याचा भाजपचा (BJP) आरोप आहे. तोच धागा पकडून शहा म्हणाले की, केजरीवाल सरकार जाहिरातींच्या माध्यमातून लोकांना फसवत आले आहे. दिल्लीत या पूर्वी अस्तित्वात असलेल्या महापालिकांत आप सरकारने त्यांचा निधी रोखला. कारण या भाजपच्या सत्ता असलेल्या महापालिका होत्या, असा आरोप शहा यांनी केला.

ते म्हणाले की, महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यापूर्वी स्वच्छतेचा संदेश दिला होता. मात्र नंतर 70 वर्षात दिल्लीत (केंद्रामध्ये) सत्तेवर आलेल्यांनी याकडे दुर्लक्ष केले. नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान बनले तेव्हा त्यांनी पुन्हा महात्मा गांधींचा संदेश प्रत्यक्षात आणून स्वच्छ भारत मोहिमेला प्रारंभ केला.

दरम्यान, दिल्लीत एकच महापालिका अस्तित्वात आल्याने अशी एक इकोसिस्टीम तयार होईल की लवकरच जगातील सर्वात चांगली राजधानी बनेल अशी आशा शहा (Amit Shah) यांनी व्यक्त केली.

कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पात दररोज 7 हजार मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता आहे. यापैकी 2 हजार मेट्रिक टन कचऱ्याचा फेरवापर करण्याचीही प्रणाली बसविण्यात आली आहे. येथून दररोज किमान 25 मेगावॉट वीजनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट सुरुवातीला ठेवण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com