नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे गोरखपूर (शहर) मतदारसंघातून विधानसभा निवडणूक (Assembly elections) लढवणार आहेत. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे योगींना टक्कर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही योगींच्या अडचणी वाढवल्या आहेत.
समाजवादी पक्षाकडून योगींच्या विरोधात शुभावती शुक्ला (Shubhawati Shukla) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या दोन दिवसांपूर्वीच आपल्या मुलांसह पक्षात दाखल झाल्या आहेत. शुभावती शर्मा या योगींचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दिवंगत उपेंद्र दत्त शुक्ला यांच्या पत्नी आहेत. शुक्ला यांच्या दीड वर्षांपूर्वी निधन झाले. गोरखपुरमध्ये भाजपचे संघटन मजबूत करण्यात शुक्ला यांचा मोठा वाटा आहे.
योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत उपेंद्र शुक्ला यांना त्यांनी उमेदवारी दिली. यावरून शुक्ला हे योगींचे उत्तराधिकारी असल्याची चर्चा त्यावेळी सुरू होती. पण या निवडणुकीत शुक्ला यांचा प्रवीण निषाद यांनी पराभव केला. त्यानंतर काही महिन्यांतच निषाद हे भाजपमध्ये दाखल झाले. उपेंद्र शुक्ला हे तीनवेळा कौडराम विधानसभा मतदारसंघातून उभे होते. पण प्रत्येकवेळी त्यांचा पराभव झाला.
चंद्रशेखर आझाद मैदानात
आजाद समाज पार्टीकडून गोरखपूर शहर मतदारसंघासाठी चंद्रशेखऱ आझाद (ChandraShekhar Aazad) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या पक्षाकडून आतापर्यंत 33 जणांची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. सुरूवात आझाद व समाजवादी पक्षामध्ये आघाडी होणार असल्याची चिन्ह होती. पण अखेरच्या टप्प्यात आझाद यांनी स्वतंत्रपुणे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. तसेच आता ते थेट योगींच्या बालेकिल्ल्यात जाऊत त्यांना आव्हान देणार आहे.
आजाद समाज पार्टी मागील दोन वर्षांपासून राजकारणात आहे. 2020 मध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुकीतही या पक्षाने ताकद दाखवली आहे. काही जागांवर या पक्षाने तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली आहे. असे असले तरी उत्तर प्रदेशातील त्यांची ताकद कमी आहे. योगी हे गोरखपुर मतदारसंघातून पाचवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.
आझाद यांनी 2015 मध्ये भीम आर्मी या संघटनेची स्थापना केली आहे. त्यांनी विधी शाखेची पदवी घेतली आहे. मे 2017 मध्ये शब्बीरपूर गावांत झालेल्या जातीय दंगल झाल्यानंतर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले होते. यावेळी त्यांना अटक झाली होती. तुरूंगात बाहेर पडल्यानंतरही त्यांनी दलितांसाठी लढा उभारला आहे. उत्तर प्रदेशसह इतर काही राज्यांमध्येही त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.