मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान अटक आणि सुटका याशिवाय मागच्या एका महिन्याच्या काळात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. विविध आरोपांमुळे नुकताच या प्रकरणाचा तपास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. आता या प्रकरणात आणखी एका रहस्यमय व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्या दाव्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुनिल पाटील हेच या संपुर्ण प्रकरणाचे मास्टरमाईंड आहेत. आज पत्रकार परिषद घेवून केलेल्या कंबोज यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
ते म्हणाले, एका पक्षाने या प्रकरणात देशभरात चुकीचा नॅरेटिव्ह सेट केला. त्या गाजलेल्या फोटोत आर्यन खानसह किरण गोसावी दिसत आहे. त्यानंतर गोसावी भाजपशी संबंधित असल्याचेही सांगण्यात आले, तो कसा आर्यन खानला ओढत एनसीबीच्या कार्यालयात घेवून आला, हे दाखवण्यात आले. पण या सगळ्या प्रकरणामागचा मास्टरमाईंड सुनील पाटील आहे, असा दावाही कंबोज यांनी केला. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ मोहीत कंबोज यांनी सुनील पाटील आणि सॅम डिसूजा यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉटही शेअर केले.
सुनील पाटील यांनीच पार्टीची लीड दिली
मोहित कंबोज यांनी सुनील पाटील नामक व्यक्तीनेच क्रूझवरील ड्रग्ज पार्टीची लीड एनसीबीला दिली असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, सॅम डिसूझा यांचा उल्लेख आजवर सर्वांनी केला. नवाब मलिक, संजय राऊत, प्रभाकर साईल या सगळ्यांनी त्यांचे नाव घेतले. पण सुनील पाटील यांनीच सॅम डिसूजाला १ तारखेला व्हॉट्सअॅप मेसेज, व्हॉट्सअॅप कॉल केला होता. त्यांनी सांगितले माझ्याकडे २७ लोकांची लीड आहे. क्रूजवर ड्रग्ज पार्टी होणार आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे करून दे. यानंतर सॅम डिसुजाने एनसीबी अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्याशी बोलणे केले, आणि त्याबाबत सुनिल पाटीलला माहिती दिली.
२ ऑक्टोबरला सुनील पाटील यांनी सॅम डिसूजाला सांगितले माझ्या माणसाला तुम्ही एनसीबीच्या एका व्यक्तीची भेट घालून द्या. माझ्याकडे खूप सारी माहिती आहे. त्यावर सॅमने कोण माणूस आहे? असे विचारले असता सुनील पाटील यांनी किरण गोसावी असे नाव सांगितले. त्यानंतर सुनील पाटील यांनी सॅम डिसूजाला किरण गोसावीचा नंबर दिला आणि पुढील कारवाई करण्यासाठी किरण गोसावी मदत करेल असे सांगितले, असाही दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.
सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थापनेपासूनचे सदस्य
मोहित कंबोज यांच्या दाव्यानुसार, मुळचे धुळ्याचे असलेले सुनील पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थापनेपासूनचे सदस्य आहेत. पक्षातील अनेक नेते, मंत्र्यांशी त्यांचे घरगुती संबंध आहेत. फक्त संबंधच नाही, तर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुखचे ते चांगले मित्र आहेत. अनिल देशमुखांच्या विरोधात सुरु असलेल्या ईडी कारवाईमध्येही पाटील यांचा संबंध आहे. इतकंच नाही तर सुनील पाटील हे राज्यात गृहविभागात बदलीचे रॅकेट चालवत होते. १९९९ ते २०१४ पर्यंत ते सक्रिय होते. माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचेही ते निकटवर्तीय होते. २०१४ ला जेव्हा सरकार बदलले तेव्हा पाटील गायब झाले. मात्र पुन्हा २०१९ ला सरकार आले तेव्हा ते पुन्हा सक्रिय झाले आहेत.
राष्ट्रवादी ड्रग्जचे समर्थन करत आहे.
राष्ट्रवादी आता भाजपचा विरोध करता करता देशाचा विरोध करू लागले आहेत. राष्ट्रवादी ड्रग्सचेही समर्थन करत आहे का? याचे उत्तर द्यावे लागेल. दोन ग्रॅम, तीन ग्रॅम कोकेन हा गुन्हा होत नाही असे राज्यातले हे मंत्री म्हणतात. ड्रग्स माफियांच्या मोहिमेला वाढवण्याचे काम सुरू आहे का? असाही सवाल कंबोज यांनी उपस्थित केला आहे. मंत्री पदाची शपथ घेतली आणि पदाचा गैरवापर करत आहेत. ड्रग्स माफिया यांना संरक्षण देण्याचे काम हे करत आहेत. पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यत ड्रग्सच्या विरोधात लढू असेही ते म्हणाले
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.